INDW vs WIW Women’s T20 World Cup Warm up Match Highlights: यंदा युएईमध्ये महिला टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी संघ सराव सामने खेळत आहेत. जिथे भारतीय महिला संघाने पहिला सराव सामना खेळला आहे. या सामन्यात टीम इंडियाने वर्ल्ड चॅम्पियन टीम वेस्ट इंडिजचा २० धावांनी पराभव केला. भारताच्या विजयात जेमिमाह रॉड्रिग्ज आणि पूजा वस्त्राकर यांची भूमिका महत्त्वाची ठरली. जेमिमाह रॉड्रिग्जने आपल्या बॅटने चमकदार कामगिरी केली, तर पूजा वस्त्राकरने भेदक गोलंदाजी करत वेस्ट इंडिजला बॅकफूटवर ठेवले.

विश्वचषकापूर्वी खेळल्या गेलेल्या या सराव सामन्यादरम्यान वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना ८ गडी गमावून १४१ धावा केल्या होत्या. या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. अवघ्या २३ धावांवर भारताने तीन महत्त्वाचे विकेट गमावले. या तीन विकेट शफाली वर्मा, स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर स्वस्तात माघारी परतल्या.

हेही वाचा – Musheer Khan Video: फ्रॅक्चर अन् मानेला सर्व्हायकल कॉलर… मुशीर खान अपघातानंतर वडिलांबरोबरचा VIDEO शेअर करत म्हणाला…

हेही वाचा – SA vs IRE 2nd T20 : आयर्लंडचा ऐतिहासिक विजय! प्रथमच बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा १० धावांनी उडवला धुव्वा

भारताने झटपट तीन विकेट गमावल्यानंतर यास्तिका भाटियासह जेमिमाह रॉड्रिग्सने डावाची धुरा सांभाळली. यादरम्यान जेमिमा रॉड्रिग्जने ४० चेंडूत ५२ धावांची खेळी केली. यास्तिका भाटियाने २५ चेंडूत २४ धावा केल्या. यास्तिका भाटियाची खेळी अतिशय संथ असली तरी या स्थितीत टीम इंडियाला भागीदारीची गरज होती. वेस्ट इंडिजसाठी हेली मॅथ्यूज सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली. या सामन्यात तिने चार विकेट घेतल्या. हेली मॅथ्यूजने चार षटकात केवळ १७ धावा दिल्या.

भारतीय गोलंदाजांची भेदक गोलंदाजी

वेस्ट इंडिजच्या महिला संघासाठी १४२ धावांचे लक्ष्य फार मोठे नव्हते, परंतु भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांना या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही. त्यांनी २० षटकांत ८ गडी गमावून १२१ धावा केल्या आणि टीम इंडियाने २० धावांनी सामना जिंकला. भारताकडून पूजा वस्त्राकरने ४ षटकांत २० धावा देत ३ विकेट घेतले. याशिवाय दीप्ती शर्मानेही अप्रतिम गोलंदाजी केली आणि ३ षटकांत ११ धावा देऊन २ विकेट घेतले. वेस्ट इंडिजकडून चिनेल हेन्रीने ४८ चेंडूत ५९ धावांची खेळी केली. जी शेवटपर्यंत नाबाद होती पण तरीही तिच्या संघाला सामन्यात विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली.