T20 World Cup 2024, Irfan Pathan on Ishan Kishan: एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचे लक्ष आता टी-२० विश्वचषकाकडे लागले आहे. १९ नोव्हेंबरला फायनल हरल्यानंतर टीम इंडियाने २३ तारखेपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच टी-२० सामने खेळले. त्यांनी ही मालिका ४-१ अशी जिंकली. आता दक्षिण आफ्रिकेत भारतीय खेळाडू तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहेत. डरबनमध्ये पावसामुळे पहिला सामना रद्द झाला होता. आता दुसरा टी-२० सामना मंगळवारी होणार आहे. या सामन्यापूर्वी माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणने टी-२० विश्वचषकाबाबत मोठे वक्तव्य केले होते.
के.एल. राहुल, इशान किशन आणि जितेश शर्मा हे टी-२० विश्वचषकातील यष्टीरक्षकाचे दावेदार आहेत. राहुल याची निवड निश्चित मानली जात आहे. दुसऱ्या स्थानासाठी जितेश शर्मा आणि इशान किशन यांच्यात स्पर्धा आहे. इशानला अनुभव आहे, पण जितेश टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळू शकतो, असा विश्वास इरफान पठाणला आहे. खालच्या फळीत तो उपयुक्त फलंदाज आहे. यामुळे भारताला आक्रमक फलंदाजी करणारा यष्टीरक्षक फलंदाज मिळेल.
भारताकडे सलामीला अनेक पर्याय आहेत
जेव्हा भारताच्या टी-२० संघाचा विचार केला जातो तेव्हा निवडकर्ते क्रमवारीच्या शीर्षस्थानी असलेल्या पर्यायांबद्दल संभ्रमात असतात. इशान किशन, यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहली यांनाही टी-२० मध्ये सलामीला फलंदाजी करायला आवडते. फलंदाजीचा क्रम जसजसा खाली येतो तसतसे पर्याय कमी होत जातात. अशा परिस्थितीत इशानपेक्षा जितेश हा चांगला पर्याय असल्याचे इरफानला वाटते.
काय म्हणाले इरफान पठाण?
इरफान पठाण म्हणाला, “मी आधीच सांगितले आहे की, जर तुम्हाला इशानला ठेवायचे असेल तर सलामीला खेळवावे लागेल, मग टी-२० असो किंवा एकदिवसीय. पहिल्या चार जागी सध्या खेळाडूंचा पर्याय अधिक असल्याने संघ व्यवस्थापन गोंधळात पडले आहे. इशानसाठी ही खूप कठीण परिस्थिती आहे. बीसीसीआयने त्याचे स्थान बनवावे अन्यथा जितेश शर्माचा विचार करावा. इशानला संघात स्थान मिळेल हा माझा आत्मविश्वास आहे. संघ व्यवस्थापन नेमके काय विचार करते हे मला माहीत नाही, पण त्याची क्षमता पाहता, जे मी अनेक वर्षांपासून त्याची फलंदाजी पाहत आलो आहे. मला वाटते की त्याला नवीन चेंडूवर चांगले खेळता येते. त्यानंतर तो सेट झाला की, मग तो फिरकी चांगली खेळतो.”
जितेश हा सूर्यकुमार यादवसारखा खेळाडू आहे, असंही इरफानला वाटतं. तो म्हणाला, “जेव्हा तुम्ही मधल्या फळीत फलंदाजी करता तेव्हा तुमच्याकडे फिरकीसमोर कसे खेळायचे याचे तंत्र असते आणि तिथे किशनला कधीकधी अडचणींचा सामना करावा लागतो. जितेश शर्मा थोडा क्रिएटिव्ह खेळाडू आहे. तो सूर्यकुमार यादवसारखा आहे. गेल्या एक ते दीड वर्षात त्याचा टी-२० क्रिकेटमध्ये झालेला विकास विलक्षण आहे. तो आयपीएलमध्ये पंजाब किंग्जसाठी फिनिशरची भूमिका उत्तम प्रकारे पार पाडत आहे आणि त्याने अलीकडेच भारतासाठी दोन अतिशय चांगल्या खेळी खेळल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट नेहमीच प्रभावी असतो आणि तो फिरकी आणि वेगवान गोलंदाजी दोन्ही चांगल्या प्रकारे खेळतो.” आगामी काळात बीसीसीआय कोणाला संधी देते हे पाहणे, उत्सुकतेचे ठरणार आहे.