केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला. या सामन्यात इंग्लंडने प्रथम खेळताना ४ गडी गमावून १६६ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने १९ षटकांत ५ गडी राखून लक्ष्य गाठले. याच वर्षी विल्यमसनने त्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडला पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे (WTC) विजेतेपद मिळवून दिले.
न्यूझीलंडने आतापर्यंत एकदिवसीय विश्वचषक आणि टी-२० विश्वचषक जिंकलेला नाही. या संघाने २००० मध्ये एकमेव चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. तेव्हा स्टीफन फ्लेमिंग हा संघाचा कर्णधार होता. संघ पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.
केन विल्यमसनबद्दल सांगायचे, तर त्याच्या तीनही मोठ्या बहिणी व्हॉलीबॉल खेळाडू आहेत. यानंतरही विल्यमसनने क्रिकेटची निवड केली. तो आता देशाचा सर्वात यशस्वी कर्णधार होण्याच्या मार्गावर आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. विल्यमसनने टी-२० विश्वविजेतेपद पटकावल्यास दोन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा तो न्यूझीलंडचा पहिला कर्णधार ठरेल.
हेही वाचा – सरस छे..! पत्नी अंजलीला सचिननकडून ‘गुजराती’ ट्रीट; फोटो शेअर करत सांगितला मजेशीर किस्सा!
टी-२० विश्वचषकाचा हा सातवा मोसम आहे. वेस्ट इंडिजने दोनदा विजेतेपद पटकावले आहे. याशिवाय भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि श्रीलंका यांनी प्रत्येकी एकदा जेतेपद पटकावले आहे. न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. जर ऑस्ट्रेलियाचा संघ हा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला, तर यावेळीही आपल्याला नवा चॅम्पियन पाहायला मिळेल. पाकिस्तानने यूएईमध्ये सलग १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत त्यांना पराभूत करणे सोपे जाणार नाही.