टी-२० वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने केलेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताचे आव्हान संपुष्टात आले. इंग्लंडने १० गडी राखत भारतात दणदणीत पराभव केला. भारताने दिलेलं १६९ धावांचं आव्हान इंग्लंडने अत्यंत सहजपणे पार केलं. भारत स्पर्धेतून बाहेर पडल्याने आता अंतिम सामन्यात इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान असा सामना होणार आहे. दरम्यान भारताचा दारुण पराभव झाल्यानंतर संघाला ट्रोल केलं जात असताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही टोला लगावला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्विट केलं असून भारताच्या लाजिरवाण्या पराभवावर अप्रत्यक्षपणे उपहासात्मक टीका केली आहे. “या रविवारी १५२/० विरुद्ध १७०/० असा सामना होणार आहे,” असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यातही पाकिस्तान संघाने न्यूझीलंड संघाचा १० गडी राखून पराभव केला. याच पार्श्वभूमीवर शाहबाज शरीफ यांनी हा टोला लगावला आहे.
वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. यानंतर दोन्ही देशातील क्रिकेट चाहते पुन्हा एकदा अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान लढत होईल अशी आशा व्यक्त करत होते. पण इंग्लंड संघाने भारताचा दणदणतीत पराभव करत आव्हान संपुष्टात आणलं.
सामना संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने, टी-२० मध्ये चांगली सुरुवात करणं फार महत्वाचं असतं असं सांगितलं. “गोलंदाजी असो किंवा फलंदाजी, जर पहिल्या सहा षटकात तुम्हाला यश मिळालं नाही तर पुढील सामना कठीण होतो,” असंही त्याने सांगितलं.
भारताने २००७ मध्ये टी-२० वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर २०१४ पासून भारतीय संघ अंतिम फेरीही गाठू शकलेला नाही. यावेळी भारतीय संघाची कामगिरी पाहता पुन्हा एकदा वर्ल्डकप जिंकू अशी चाहत्यांना अपेक्षा होती. पण त्यांच्या पदरी निराशा पडली आहे.