ट्वेन्टी-२० विश्वचषकातील विंडीजविरुद्धच्या सामन्यातून माघार

दुबई : दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने (सीएसए) ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’ या वर्णद्वेषविरोधी मोहिमेला पाठिंबा दर्शवताना गुडघा टेकून बसण्याची कृती करणे सक्तीचे केल्यामुळे क्विंटन डीकॉकने मंगळवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकातील विंडीजविरुद्धच्या लढतीतून माघार घेतली.

डीकॉकच्या निर्णयाचा दक्षिण आफ्रिकेच्या संघ व्यस्थापनाला धक्का बसला असून त्यांच्या अहवालानंतर ‘सीएसए’ पुढील पावले उचलणार आहे. ‘‘क्विंटन डीकॉकने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यापूर्वी गुडघा टेकून बसण्यास नकार देण्याचा वैयक्तिक निर्णय घेतला याची दक्षिण आफ्रिकन क्रिकेट मंडळाने दखल घेतली आहे,’’ अशी सीएसएने प्रतिक्रिया दिली. डीकॉकने यापूर्वीही वर्णद्वेषविरोधी मोहिमेची कृती करण्यास नकार दिला होता. ‘‘कोणत्या गोष्टीला पाठिंबा द्यायचा हे ठरवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीची सक्ती करू शकत नाही,’’ असे डीकॉक काही काळापूर्वी म्हणाला होता.

‘सीएसए’ने त्यांच्या खेळाडूंना कृष्णवर्णीय नागरिकांची हत्या आणि अत्याचाराच्या विरोधातील मोहिमेला पाठिंबा दर्शवणे सक्तीचे केले. दक्षिण आफ्रिकेत पूर्वी कृष्णवर्णीयांचा क्रिकेटमध्येही समावेश केला जात नव्हता. मात्र, आता परिस्थितीत बदल झाल्याचा संदेश ‘सीएसए’ला द्यायचा आहे.

कर्णधार बव्हूमाकडून समर्थन

डीकॉकने मंगळवारी उचललेल्या पावलाचे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेम्बा बव्हूमाने समर्थन केले. सीएसएने सामन्याला सुरुवात होण्यास काही तास असताना अशाप्रकारचा निर्णय घेणे योग्य नव्हते, असे दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करणारा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू बव्हूमा म्हणाला. ‘‘डीकॉक आमचा सहकारी आहे. त्यामुळे आम्ही त्याच्या पाठीशी आहोत. त्याला कोणताही संदेश द्यायचा झाल्यास आम्ही अंतर्गत चर्चा करू,’’ असे बव्हूमाने स्पष्ट केले.

Story img Loader