भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणीच असते. संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेणारा असाच सामना यंदा टी २० विश्वचषकामध्ये पहायला मिळणार आहे. २४ ऑक्टोबर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार असून त्याबद्दलच्या चर्चा आतापासूनच सुरु झाल्या आहेत. भारतामधील राजकीय नेत्यांपासून खेळाडूंपर्यंत अनेकजण या सामन्याबद्दल वेगवेगळी वक्तव्य करत असतानाच भारताची स्टार टेनिसपटू आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झाने या सामन्याआधीच एक महत्वाची पोस्ट आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन केलीय.
सानिया मिर्झाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत आपण आता काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहणार असल्याची माहिती चाहत्यांना दिलीय. सानियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये टेक्सटच्या माध्यमातून हा संदेश देण्यात आलाय. “मी भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या सामन्याच्या दिवशी सोशल मीडिया आणि टॉक्सिसिटी (वाई़ट वातावरणापासून) दूर राहण्याच्या हेतूने गायबच असेल,” असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना सानिया मिर्झाने कॅप्शनमध्ये, ‘बाय-बाय’ असं लिहिलं आहे.
या व्हिडीओवर भारतीय संघाचा माजी फलंदाज युवराज सिंहने हसणारे इमोन्जी पोस्ट करत एक कमेंट केलीय. “चांगला विचार आहे,” असं युवराजने म्हटलंय.
सानियाने शोएब मलिकसोबत लग्न केल्यापासून अनेकदा तिला सोशल मीडियावर पाकिस्तानी नवऱ्याचा संदर्भ देत ट्रोल केलं जातं. यापूर्वीही तिने अशाप्रकारे भारत पाकिस्तान सामन्यांच्या वेळेस सोशल नेटवर्किंगपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचं पहायला मिळालं होतं. सानियाचा पती शोएब मलिकला अगदी शेवटच्या क्षणी टी २० विश्वचषकासाठीच्या संघामध्ये स्थान देण्यात आलं आहे. जखमी झालेल्या सोहेब मकसूदच्या जगी शोएबला संधी देण्यात आली आहे. शोएब भारताविरुद्धचा सामना खेळण्याची दाट शक्यता आहे.