भारताविरुद्ध नेहमी बेधडक वक्तव्य करणारा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने टी-२० वर्ल्डकपमधील सामन्यापूर्वी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र यावेळी त्याला पाकिस्तानला आणखी एक पराभव स्वीकारावा लागू शकतो, अशी भीती वाटत आहे. आज टी-२० विश्वचषकात टीम इंडिया दुबईच्या मैदानावर पाकिस्तानशी सामना खेळणार आहे. जुन्या विक्रमामुळे आणि सध्याच्या फॉर्ममुळे भारताला विजयाचा सर्वात मोठा दावेदार मानले जात आहे.

पाकिस्तानी टीव्ही चॅनल समा टीव्हीशी बोलताना आफ्रिदीला विचारण्यात आले की, या सामन्यात कोणाचा वरचष्मा असेल? यावर आफ्रिदी म्हणाला, ”दोन्ही संघ अनुभवी आहेत. टीम इंडिया १०-१५ वर्षांपासून चांगली खेळत आहे. मला विश्वास आहे, की त्यांच्या बोर्डाने टीम इंडियावर खूप गुंतवणूक केली आहे. हा सामना डोक्याने आणि मनाने खेळला जाईल. भारताचे पारडे थोडे जड आहे. त्यांच्या जिंकण्याच्या संधी जास्त आहेत. बघूया कोणता संघ दबाव चांगला हाताळतो. चांगली मानसिकता आणि देहबोली आवश्यक आहे.”

हेही वाचा – T20 WC : “इंशाअल्लाह! पाकिस्तान भारताला…”, सामन्याच्या काही तासांपूर्वी पंतप्रधान इम्रान खान यांचं ‘मोठं’ विधान!

आफ्रिदी पुढे म्हणाला, ”टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंना त्यांचे शंभर टक्के द्यावे लागतील. घाबरण्याची गरज नाही. दबावावर मात करावी लागेल. खेळाडूंना त्यांच्या कामगिरीचा आनंद घ्यावा लागतो. तुमचे शंभर टक्के द्या. आता मॅच संपल्यावर हॉटेलमध्ये जाताना थोडे चांगले खेळले असतो, तर बरे झाले असते, असा विचार मनात आणू नये. लढा आणि परिणामांची पर्वा करू नका.”

वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे. १९९२च्या एकदिवसीय विश्वचषकापासून सुरू झालेला विजयाचा सिलसिला आजही कायम आहे. एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियाने आतापर्यंत ७ वेळा पाकिस्तानचा पराभव केला आहे. तर टी-२० विश्वचषकात भारताने पाकिस्तानला ५ वेळा हरवले आहे. म्हणजेच एकूणच भारताने वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध १२ वेळा विजय मिळवला आहे.

Story img Loader