पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय संघावर ताशेरे ओढले आहेत. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताला न्यूझीलंडकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. करा-वा-मरो सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने फलंदाजी आणि गोलंदाजीत निराशा केली. टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताला पुन्हा न्यूझीलंडसमोर पराभव पत्करावा लागला. सामन्यानंतर अख्तरने आपली प्रतिक्रिया दिली.

भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक गमावली आणि त्यानंतर सलग दुसऱ्यांदा संघाला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाले. मात्र, भारताची टॉप ऑर्डर पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरली. त्यानंतर गोलंदाजांनाही छाप पाडता आली नाही. किवी फलंदाजांनी संयमाने फलंदाजी केली. न्यूझीलंडचा हा दोन सामन्यांतील पहिला विजय ठरला. किवी संघाला पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

हेही वाचा – IND vs NZ: “हे सर्व पैशांसाठी” ; न्यूझीलंडविरुद्धच्या लाजिरवाण्या कामगिरीमुळे संतापले चाहते; IPLवर बंदी घालण्याची मागणी

अख्तरने यूट्यूब चॅनेलवर अख्तरने भारतीय संघाच्या रणनीतीवर जोरदार टीका केली. अख्तर म्हणाला, ”भारतीय संघाकडे गेम प्लॅन नव्हता. भारतीय संघ आज सामना खेळायला आला आहे असे वाटत नव्हते. फक्त न्यूझीलंडचा संघ सामना खेळायला आला आहे, असे वाटले. मला समजत नाही की तो कोणत्या मानसिकतेने आणि वृत्तीने खेळत होते. रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर का खेळला? त्याने इशान किशनसोबत डावाची सुरुवात का केली नाही? हार्दिक पंड्या डावात खूप उशीरा गोलंदाजी करायला आला. त्याने आधी गोलंदाजी करायला हवी होती. भारताचा गेम प्लॅन काय आहे हे मला समजले नाही.”

अख्तर म्हणाले, ”भारतीय मीडियाने संघावर खूप दबाव टाकला होता. मला माहीत होते, की असे होणार. नाणेफेकही भारताने गमावली. प्रथम फलंदाजी करताना चेंडू बॅटवर नीट येत नाही आणि नंतर गोलंदाजांना त्याचा काही उपयोग होत नाही. चेंडू स्विंगही होत नाही आणि खेळपट्टीची मदतही मिळत नाही.”