विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून १० गड्यांनी मात खावी लागली. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात भारताचे रोहित शर्मा, केएल राहुल हे स्टार फलंदाज चांगली सलामी देण्यात अपयशी ठरले. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने रोहितला खातेही खोलू दिले नाही. या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत विराटला रोहितबाबत एक प्रश्न विचारला गेला, ज्यावर विराटने उत्तर देत हिटमॅनच्या चाहत्यांची मने जिंकली.
इशान किशनचा फॉर्म पाहता त्याला रोहित शर्माऐवजी खेळवले पाहिजे का?, असा प्रश्न एका पत्रकाराने विराटला विचारला. यावर विराट आश्चर्यचकित होऊन म्हणाला, ”तुम्ही रोहितला टी-२० संघातून बाहेर काढणार?…हे खरेच अविश्वसनीय आहे.” विराट आपली प्रतिक्रिया दिल्यानंतर खाली मान घालून हसू लागला. रोहित हा क्रिकेटविश्वातील अव्वल दर्जाचा फलंदाज मानला जातो, रोहितला भारतीय संघाबाहेर करण्याबाबतच प्रश्न ऐकून विराटला हसू आले.
हेही वाचा – IND vs PAK : मॅच जिंकताच पाकिस्तानच्या खेळाडूनं विराटला मारली मिठी; मग कोहलीनं केली ‘अशी’ कृती!
पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर विराट कोहलीने आपल्या भावना व्यक्त केल्या. “आम्ही आमची योजना योग्य प्रकारे अंमलात आणू शकलो नाहीत. आमचे सलामीचे गडी झटपट बाद झाले. अशावेळी सामन्यात पुनरागमन करणे कठीण असते. मैदानातील दव पाहता कठीण होते. पाकिस्तानने दर्जेदार गोलंदाजी केली. आमचा संघ घाबरणारा नक्कीच नाही. ही स्पर्धेची सुरुवात आहे शेवट नाही”, असे कर्णधार विराट कोहलीने सामन्यानंतर सांगितले.
असा रंगला सामना…
बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत भारताला मात देत नव्या इतिहासाची नोंद केली आहे. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्ताने भारताला पहिल्यांदाच मात दिली आहे. पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा, केएल राहुल हे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर विराटने किल्ला लढवला. त्याच्या अर्धशतकी योगदानामुळे भारताने पाकिस्तानला १५२ धावांचे आव्हान दिले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने धडकी भरवणारा स्पेल टाकला आणि रोहित, राहुल आणि विराटला माघारी धाडले. प्रत्युत्तरात सलामीवीर मोहम्मद रिझवान आणि कप्तान बाबर आझम यांनी दमदार १५२ धावांची भागीदारी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. रिझवानने नाबाद ७९ तर बाबरने नाबाद ६८ धावांची खेळी केली. आफ्रिदीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.