पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमने यंदाच्या टी-२० वर्ल्डकपमधील भारताविरुद्धच्या सामन्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या सामन्यात भारतीय संघावर खूप दबाव असेल. त्यामुळे त्यांना पराभूत करून आम्ही टी-२० वर्ल्डकप मोहिमेची सुरुवात करू, असे आझमने सांगितले. टी-२० विश्वचषक यंदा १७ ऑक्टोबरपासून ओमानमध्ये सुरू होत आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला दुबईत खेळला जाईल. भारतीय संघ २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) नवनियुक्त अध्यक्ष रमीज राजा यांची भेट घेतल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर बाबर आझमने ही प्रतिक्रिया दिली. टी-२० वर्ल्डकपची सुरुवात पहिल्या फेरीने होणार असून पहिला सामना १७ ऑक्टोबर रोजी यजमान ओमान आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात खेळला जाईल.

पहिल्या फेरीत ८ संघ सुपर १२मध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळतील. आयर्लंड, नेदरलँड, श्रीलंका आणि नामिबियाला अ गटात ठेवण्यात आले आहे, तर गट ब गटामध्ये ओमान, पीएनजी, स्कॉटलंड आणि बांगलादेश हे संघ आहेत. प्रत्येक गटातील फक्त अव्वल २ संघ दुसऱ्या फेरीत म्हणजेच सुपर १२ मध्ये प्रवेश करतील.

हेही वाचा – ENG vs IND : इंग्लंडच्या हसीब हमीदचं ‘कृत्य’ पाहून विराट संतापला, थेट अंपायरकडं केली तक्रार!

सुपर १२ चे दोन गट असतील, यातील पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी दुबई येथे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील गट १ मध्ये खेळला जाईल. दुसरा सामना त्याच दिवशी इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला जाईल.

याआधी भारताचा माजी सलामीवीर आणि २००७ च्या टी-२० वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने भारताला पाकिस्तानपेक्षा चांगला संघ म्हणून संबोधले होते. तो म्हणाला होता, ”पाकिस्तानकडून अपेक्षा देखील खूप जास्त असतील आणि जर तुम्ही यावेळी पाहिले तर भारतीय संघ पाकिस्तानपेक्षा खूप चांगला संघ आहे.”

Story img Loader