नागपूर : भारताच्या माजी टेबल टेनिसपटू मीना परांडे यांचे शुक्रवारी नागपूर येथे निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या.
मीना या १२ वर्षांपूर्वी पुण्याहून नागपूरला आल्या होत्या. प्रथम मैत्रबन वृद्धाश्रमात आणि मग वर्धा मार्गावरील समाधान केअर सव्‍‌र्हिसमध्ये त्या वास्तव्यास होत्या. प्रकृती खालावल्याने त्यांना नागपूर येथील विवेका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मीना यांनी जवळपास दोन दशकांच्या टेबल टेनिसमधील कारकीर्दीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली होती. त्यांनी चार वेळा राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्या १९५३ ते १९५८ या कालावधीत महाराष्ट्र, तर १९५९ ते १९६५ या कालावधीत रेल्वेकडून खेळल्या. तसेच मीना यांनी १९५४मध्ये इंग्लंड, तर १९५६मध्ये जपान येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी सिंगापूर, व्हिएतनाम, पाकिस्तान आणि श्रीलंका आदी देशांमध्येही स्पर्धा खेळल्या होत्या.
खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर मीना यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावताना अनेक टेबल टेनिसपटू घडवले. डॉ. चारुदत्त आपटे, राजीव बोडस, सुहास कुलकर्णी, नीला कुलकर्णी यांसारख्या खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शन केले होते.