Tabrez Shamsi said Babar Azam is a world class player : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा आधुनिक काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. २८ वर्षीय स्टार फलंदाज गेल्या काही वर्षांपासून खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शानदार कामगिरी केली आहे,त्याने स्वत:ला जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असल्याचे सिद्ध केले आहे. तथापि, अनेकजण असा युक्तिवाद करत आहेत की, बाबर आझम डावखुऱ्या फिरकीपटूंविरुद्ध खेळताना संघर्ष करत आहे. आता दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेझ शम्सीने बाबर आझमबद्दल त्याचे मत व्यक्त केले आहे.
बाबर आझम हा जागतिक दर्जाचा फलंदाज आहे – तबरेझ शम्सी
कारण श्रीलंकेच्या प्रभात जयसूर्याने पाकिस्तानच्या स्टार फलंदाजाला सात डावांत सहा वेळा बाद केले आहे. यानंतर डावखुऱ्या फिरकीपटूंविरुद्ध बाबरच्या फलंदाजीच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशात आता दक्षिण आफ्रिकेचा फिरकीपटू तबरेझ शम्सीने बाबर आझमबद्दल प्रतिक्रिया दिली. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटर तबरेझ शम्सी याने बाबर आझमचा बचाव करताना म्हटले की, पाकिस्तानचा कर्णधार हा जागतिक दर्जाचा फलंदाज आहे. त्यामुळे जागतिक दर्जाच्या फलंदाजावर टीका करण्यात काही अर्थ नाही.
स्पोर्ट्सकीडाशी बोलताना तबरेझ शम्सी म्हणाला, “ठिक आहे, जर लोक म्हणत असतील की बाबर कमकुवत आहे आणि त्याची सरासरी पन्नास आहे, तर मी बाबरला कमकुवत पाहण्यास प्राधान्य देईन. तो एक जागतिक दर्जाचा फलंदाज आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पन्नासची सरासरी असणे, हा विनोद नाही. त्यामुळे लोक ज्या प्रकारच्या गोष्टी बोलतात ते निरुपयोगी आहे असे मला वाटते. अशा प्रकारच्या वादाला काही अर्थ नाही.”
आपण जागतिक दर्जाच्या खेळाडूंचे कौतुक केले पाहिजे – तबरेझ शम्सी
तबरेझ शम्सी पुढे म्हणाला, “तो एक दर्जेदार खेळाडू आहे आणि हो, कोणताही गोलंदाज त्याचा दिवस असल्यावर कोणत्याही फलंदाजाला बाद करू शकतो. तसेच कोणताही फलंदाज त्याच्या दिवस असल्यावर शतक ठोकू शकतो. त्यामुळे जो कोणी त्या स्तरावर खेळत असेल तो आपले काम करेल. तो आपल्या कामात खूप चांगला आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याऐवजी त्याचे कौतुक केले पाहिजे, असे मला वाटते.” बाबर आझम ३० ऑगस्टपासून आगामी आशिया कप २०२३ आणि ५ ऑक्टोबरपासून विश्वचषक २०२३ मध्ये खेळताना दिसेल.