दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजांचेच वर्चस्व दिसून आले. न्यूझीलंडच्या रॉस टेलरने कसोटी कारकीर्दीतील दुसरे द्विशतक झळकावून क्रिकेटरसिकांना खूश केले. मात्र रविवारी न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यमसन आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने क्रिकेट इतिहासात आपले नाव अधोरेखित केले.
ऑस्ट्रेलियाने उभारलेल्या ९ बाद ५५९ (डाव घोषित) धावसंख्येला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंडने ६ बाद ५१० अशी दमदार मजल मारली आहे. किवी संघ आता फक्त ४९ धावांनी पिछाडीवर आहे. खेळ थांबला तेव्हा, टेलर २३५ आणि मार्क क्रेग ७ धावांवर खेळत होते. टेलरने ३०८ चेंडूंत ३४ चौकारांसह आपली खेळी साकारली.
जोश हॅझलवूडच्या चेंडूवर मिचेल जॉन्सनने मिडऑनला झेल घेतल्यामुळे विल्यमसनची खेळी संपुष्टात आली. टेलर आणि विल्यमसनने तिसऱ्या विकेटसाठी २६५ धावांची विक्रमी भागीदारी रचली. याचप्रमाणे स्टार्कने वेगवान चेंडू टाकण्याचा पराक्रम दाखवला.
विल्यमसनचा पराक्रम
२५ वर्षीय विल्यम्सनने १६६ धावांची खेळी साकारून न्यूझीलंडला महत्त्वाचे योगदान दिले. १२ कसोटी शतके झळकावणाऱ्या चार युवा फलंदाजांमध्ये आता विल्यमसनचीही गणना झाली आहे. या वयात सचिन तेंडुलकर (१६), डॉन ब्रॅडमन (१३) आणि अॅलिस्टर कुक (१२)यांनी हा पराक्रम दाखवला आहे. विल्यमसनने सलग दुसऱ्या कसोटीत शतक साकारले आहे.
उमेश यादव चमकला
पीटीआय, नागपूर<br />दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अंतिम अकरात समावेश न झालेल्या उमेश यादवने विदर्भच्या राजस्थानविरुद्धच्या रणजी क्रिकेट स्पर्धेच्या लढतीत ४ बळींची नोंद केली. उमेशच्या या प्रदर्शनाच्या जोरावर विदर्भने पहिल्याच दिवशी राजस्थानचा पहिला डाव २१६ धावांत गुंडाळला.
राजस्थानचा कर्णधार अशोक मनेरियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र उमेशसह आदित्य सरवटे आणि अक्षय वाखरे यांनी विदर्भ संघासाठी हा निर्णय सार्थ ठरवला. राजस्थानने ठरावीक अंतरात विकेट्स गमावल्या. पुनीत यादवने ६७ तर सिद्धार्थ डोबलने ५१ धावांची खेळी केली. मात्र अन्य फलंदाजांनी मोठी खेळी करण्यात अपयश आले. उमेश यादवने सलामीवीर प्रणय शर्मासह तळाच्या फलंदाजांना स्थिरावू दिले नाही. अनुभवी विनीत सक्सेना सरवटेच्या गोलंदाजीवर बाद झाला. यंदाच्या हंगामात राजस्थानकडून खेळण्याचा निर्णय घेतलेला रजत भाटिया वाखरेच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. उमेशने ४ तर अक्षय वाखरेने ३ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान (पहिला डाव) : ८८.४ षटकांत सर्वबाद २१६ (पुनीत यादव ६७, सिद्धार्थ डोबल ५१; उमेश यादव ४/४५, अक्षय वाखरे ३/७८)