सराव ट्रॅकजवळ खेळाडूंचा सराव सुरू असताना बाजूला असलेल्या ताजिकिस्तानच्या तंबूतून ऐकू येणारे ‘ले जायेंगे, ले जायेंगे’ हे गाणे सर्वाचेच लक्ष वेधत होते. या संघाच्या भारतीय समन्वयक अधिकारी हे गीत म्हणत असावा, असा साऱ्यांचाच प्राथमिक अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात त्यांचा अॅलेक्झांडर प्रोझेन्को हा खेळाडू हे गाणे म्हटत होता.
ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथील रहिवासी असलेल्या प्रोझेन्कोला गेली आठ वर्षे हिंदी चित्रपट पाहण्याचा छंद आहे. अर्थात इंटरनेटद्वारे तो हे चित्रपट पाहात आहे. आठ वर्षांपूर्वी तो राहत असलेल्या इमारतीमध्ये त्याच्या शेजारी भारतीय कुटुंब राहत होते. त्यांच्याशी मैत्री झाल्यानंतर त्याला हिंदी चित्रपटांची गोडी लागली. अमिताभ बच्चन, शाहरुख यांचे आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपट त्याने पाहिले आहेत. अनेक हिंदी गाणी त्याने तोंडपाठ केली आहेत. किशोर कुमार व आशा भोसले यांची गाणी त्याला खूप आवडतात. त्याच्या घरी त्याने हिंदूी गाण्यांच्या सीडीजचा संग्रह केला आहे.
प्रोझेन्को हा येथे २०० व ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सहभागी झाला आहे. त्याची बहीण क्रिस्तिना ही महिलांच्या हेप्टॅथलॉनमध्ये सहभागी झाली आहे. तिला मात्र हिंदी चित्रपटांची अजिबात आवड नाही. भारतीय खाद्यपदार्थ या दोन्ही खेळाडूंना आवडतात. येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये हे दोघेही भारतीय खाद्यपदार्थाचा मनसोक्त आनंद घेत आहेत.
मैदानावर उतरण्याचा मोह होतो -पी. टी. उषा
आशियाई मैदानी स्पर्धा भारतात बऱ्याच वर्षांनी होत आहे. पुण्यातील वातावरण व ट्रॅक पाहून स्पर्धेसाठी पुन्हा मैदानावर उतरण्याचा मोह होतो, असे भारताची सुवर्णकन्या पी. टी. उषा हिने सांगितले. तिची शिष्या टिंटू लुका या स्पध्रेत ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत नशीब आजमावत आहे. टिंटूकडून उषा हिला सुवर्णपदकाच्या आशा आहेत.
लंडन येथील ऑलिम्पिकमध्ये टिंटू कुठे कमी पडली, असे विचारले असता उषा म्हणाली, ‘‘या स्पर्धेकरिता तिने भरपूर सराव केला होता. मात्र ऑलिम्पिक स्पर्धेचे दडपण तिने घेतले व त्यामुळेच ती अपेक्षेइतकी कामगिरी करू शकली नाही. या स्पर्धेद्वारे तिला खूप काही शिकायला मिळाले आहे. रिओ येथे २०१६मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत ती पदक मिळवील अशी मला खात्री आहे.’’
भारतीय खेळाडूंचा सध्याच्या दर्जाविषयी विचारले असता उषा म्हणाली, ‘‘भारतीय खेळाडूंकडे भरपूर नैपुण्य आहे. आमच्या काळापेक्षा त्यांना भरपूर सुविधा व सवलती मिळत आहेत. मात्र ऑलिम्पिककरिता आवश्यक असणारी निष्ठा व एकाग्रता या खेळाडूंमध्ये दिसत नाही.’’