कसोटी संघातून डच्चू देण्यात आलेल्या वीरेंद्र सेहवागला संघात समाविष्ट करावे, असे मत बीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांनी व्यक्त केले. सामना जिंकून देण्याच्या त्याच्या क्षमतेसाठी केवळ कसोटी नव्हे तर तिन्ही प्रकारांमध्ये त्याला संघाचा अविभाज्य घटक करावे, अशी सूचनाही लेले यांनी केली आहे.
त्याच्या नावावर दोन त्रिशतके आहेत. तिसऱ्या त्रिशतकाच्याही तो जवळपास पोहचला होता. तो सामना जिंकून देणारा खेळाडू आहे. जोपर्यंत तो तंदुरुस्त आणि उपलब्ध आहे, तोपर्यंत तो कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० प्रकारात संघाचा भाग असणे आवश्यक आहे. माजी कर्णधार विजय हजारे यांच्या ९८व्या जन्मदिनानिमित्त लिजंड्स क्लब उपक्रमांतर्गत क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथे आयोजित कार्यक्रमात लेले बोलत होते.