Nitish Reddy on Gautam Gambhir after Perth Test 1st inning : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात पदार्पण करणारा नितीश रेड्डी हा भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याच्या ४१ धावा आणि ऋषभ पंतसह सातव्या विकेटसाठी केलेल्या ४८ धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळेच भारताला १५० धावांपर्यंत मजल मारता आली. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत नितीश रेड्डी यांनी कसोटी क्रिकेटमधील आपल्या पहिल्या डावाबद्दल प्रतिक्रिया दिली. यावेळी त्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने फलंदाजीपूर्वी त्याला काय सांगितले होते, तेही सांगितले.
भारतासाठी कसोटी पदार्पण करणाऱ्या नितीश कुमार रेड्डी यांनी कबूल केले की वेगवान गोलंदाजांना अनुकूल असलेल्या पर्थच्या खेळपट्टीवर फलंदाजी करण्यापूर्वी तो ‘नर्व्हस’ होता, परंतु मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या सल्ल्याने त्याचे मनोबल वाढले. नितीशने सांगितले की, गंभीरने त्याला बाउंसर बॉल्सचा सामना कसा करायचा सांगितले होते? गंभीर म्हणाला होता की, ‘तुम्ही देशासाठी गोळी झेलत आहात, अशा प्रकारे बाउंसर बॉल्सचा सामना करा. येथील ऑप्टस स्टेडियमवर नितीशने ५९ चेंडूत ४१ धावांची धाडसी खेळी खेळली आणि संघाची धावसंख्या १५० धावांपर्यंत पोहोचवली. त्याने ऋषभ पंत (२७) सोबत ४८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
‘देशासाठी गोळी झेलत असल्याप्रमाणे बाऊन्सरचा सामना करावा लागेल’ –
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर नितीश कुमार पत्रकार परिषदेत म्हणाला की, “मी पर्थच्या विकेटबद्दल (पीच) खूप ऐकले आहे. त्यामुळे फलंदाजीपूर्वी थोडा नर्व्हस झालो होतो. पर्थच्या विकेटवरच्या बाऊन्सबद्दल सगळे बोलत होते, हे माझ्या मनात होते. तथापि, मला आमच्या शेवटच्या सराव सत्रानंतर गौतम सरांशी झालेला संवाद आठवतो. त्यांनी मला सांगितले होते की, तुम्हाला देशासाठी गोळी झेलत असल्याप्रमाणे बाऊन्सरचा सामना करावा लागेल.’ प्रशिक्षकाच्या या गोष्टीने माझे मनोबल वाढले. हे ऐकून मला वाटले की देशासाठी गोळी झेलणे गरजेचे आहे. गौतम सरांकडून मी ऐकलेली ही सर्वात चांगली गोष्ट आहे.”
u
u
‘मला एक दिवसापूर्वी कळले’ –
या २१ वर्षीय खेळाडूने सांगितले की, पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला त्याला त्याच्या पदार्पणाची माहिती मिळाली होती. नितीश म्हणाला, “मला आणि हर्षितला एक दिवस आधी आमच्या पदार्पणाची माहिती मिळाली होती आणि आम्ही खूप उत्साहित होतो. आम्ही शांत होतो आणि मागच्या आठवड्यात करत होतो तसाच दिनक्रम पाळत होतो. आम्हाला जास्त दबाव घ्यायचा नव्हता. म्हणून काल संध्याकाळीही आम्ही सायकल चालवली होती, त्यामुळे छान वाटलं.”