Kapil Dev on Sunil Gavaskar: भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जगातील सर्वात महागडी क्रिकेट स्पर्धा इंडियन प्रीमियर लीगला आपल्या आर्थिक सामर्थ्याने मोठे केले. खेळाडूही श्रीमंत झाले आहेत. उच्च पगाराच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट्सपासून ते किफायतशीर आयपीएल डील ते मोठ्या ब्रँड एंडोर्समेंटपर्यंत, भारतीय क्रिकेटपटूसाठी उत्पन्नाचे अनेक मार्ग आहेत. त्यामुळे अनेक क्रिकेटपटूंची संपत्ती कोट्यावधींच्या घरात गेली आहे. मात्र, एवढे सगळे असूनही, भारताचा १९८३चा विश्वचषक विजेता कर्णधार कपिल देव यांना वाटते की खेळात नेहमीच सुधारणेला वाव आहे. त्यांनी संघातील काही वरिष्ठ खेळाडूंवर टीका केली आहे.
कपिल देव यांनी इंडियन एक्स्प्रेसच्या ‘वेक अप इंडिया’ या मुलाखतीत भारतीय खेळाडूंवर सडकून टीका केली आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, काहीवेळा अहंकार जास्त पैसा असण्याने येतो. सध्याच्या युगातील खेळाडू पैशाच्या गर्वात इतके बुडाले आहेत की त्यांना त्याच्यापुढे देश वैगेरे काहीही दिसत नाही. त्यांना भारत जिंकला काय हरला काय काहीही फरक पडत नाही. हा विश्वचषक नाही जिंकलो शकलो तर पुढचा आहेच. या मानसिकतेने ते सध्या खेळत आहेत. कारण मोठ्या आयसीसी स्पर्धेनंतरही कुठल्याही खेळाडूंवर जबाबदारी निश्चित केली जात नाही. कारण त्यांना माहिती आहे की, संघातून कोणीही त्यांना बाहेर काढू शकत नाही आणि काढलेच तर आयपीएल आहेच.”
पुढे कपिल देव म्हणाले की, “काही वरिष्ठ खेळाडू किंवा युवा खेळाडू सुद्धा माजी खेळाडूंचा सल्ला घेत नाहीत आणि तीच चूक पुन्हा पुन्हा करतात.” असे कपिल देव यांना वाटते. ते पुढे म्हणाले, “या खेळाडूंची चांगली गोष्ट म्हणजे ते खूप आत्मविश्वासू आहेत. नकारात्मक बाजू म्हणजे त्यांना वाटते की त्यांना सर्वकाही माहित आहे. आपली कधी चूक होऊच शकत नाही, असे त्यांना वाटते. यापेक्षा चांगले कसे होऊ शकतो हे त्यांना कधीच वाटत नाही कारण, त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास आहे.” अशा पद्धतीने त्यांनी टीम इंडियातील खेळाडूंचे नाव न घेता त्यांना उपरोधिक टोला मारला.
तुम्ही गावसकरांशी का बोलत नाही- कपिल देव
माजी विश्वचषक विजेते कपिल देव म्हणाले, “तुम्हाला कोणाला विचारण्याची गरज वाटत नाही. मला विश्वास आहे की एक अनुभवी व्यक्ती तुम्हाला संकटाच्या काळात मदत करू शकते. पण कधी कधी खूप पैसा आला की अहंकार येतो. या क्रिकेटपटूंना वाटते की त्यांना सर्व काही माहित आहे. आमच्या पिढीत आणि आताच्या पिढीत हाच फरक आहे. मी म्हणेन की, असे बरेच क्रिकेटपटू आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. सुनील गावसकर यांच्यासारखा दिग्गज खेळाडू तुमच्या जवळ असताना तुम्ही त्यांच्याशी का बोलू शकत नाही? अहंकार कुठे का आडवा येतो तुमचा? मला वाटत की हा अहंकार नाही, त्यांना वाटते की आपण पुरेसे चांगले आहोत.”
काय म्हणाले होते सुनील गावसकर?
माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर, भारतीय क्रिकेटमधील सर्वात प्रतिष्ठित नावांपैकी एक, अलीकडेच ते म्हणाले की, सध्याचे भारतीय क्रिकेटपटू क्वचितच सल्ला घेण्यासाठी त्यांच्याकडे येतात. गावसकर अलीकडेच एका मुलाखतीत म्हणाले होते की, “राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, सौरव गांगुली यांसारखे दिग्गज खेळाडूमाझ्याकडे नियमित यायचे. ते माझ्याकडे विशिष्ट समस्या घेऊन यायचे आणि मी त्यांना तुम्ही कुठे चुकत आहात, ती चूक पाहिलेली गोष्ट सांगू शकत होतो. मला यात कोणताही अहंकार नव्हता किंवा त्यांनाही संकोच वाटत नव्हता. मी त्यांच्याशी जाऊन बोलू शकलो असतो, पण राहुल द्रविड आणि विक्रम राठौर हे दोन प्रशिक्षक असल्यामुळे, कधी कधी तुम्ही त्यांना जास्त माहिती देऊन गोंधळात टाकू इच्छित नसल्यामुळे मी वेळीच थांबतो.”