ऑस्ट्रेलियात नैपुण्य शोधाचा अभाव असल्यामुळेच तेथील क्रिकेटपटूंच्या निर्मितीमधील प्रक्रियेतच मोठे भगदाड आहे, असे सांगून ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी देशाच्या क्रिकेट व्यवस्थापनावर कडाडून टीका केली आहे.
क्रिकेटमधील अपयशास देशातील क्रिकेट मंडळच जबाबदार आहे. अपयशामागील खरी समस्या कोणती आहे याचा अभ्यास करण्यात त्यांना अपयश आले आहे. कठीण परिस्थितीशी कसे तोंड द्यायचे याचे ज्ञान रिकी पॉन्टिंग, मायकेल क्लार्क व मायकेल हसी आदी खेळाडूंना होते. हल्लीच्या पिढीतील खेळाडूंमध्ये त्या दृष्टीचा अभाव आहे असे चॅपेल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,‘‘अव्वल दर्जाचे फलंदाज तयार करण्याची आमच्याकडील पद्धतच सदोष आहे. १९ वर्षांखालील खेळाडूंच्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघातील अनेक फलंदाजांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली होती, मात्र त्यांना वरिष्ठ संघात स्थान मिळाले नाही.’’
‘‘जर फलंदाजांची निर्मिती करण्याच्या पद्धतीद्वारे चांगले फलंदाज वरिष्ठ संघाकरिता मिळत नसतील तर ती पद्धत चुकीची आहे आणि त्यात आमूलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे. उच्च कामगिरी व्यवस्थापक आणला तरी फारसा फरक पडणार नाही. जर बदल करण्याची इच्छाशक्ती नसेल तर मूळ समस्या तशीच राहणार आहे,’’ असेही चॅपेल यांनी सांगितले.

Story img Loader