करोनामुळे स्थगित झालेली आयपीएल २०२१ स्पर्धा पुन्हा सुरु झाली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात स्थगितीनंतर पहिला सामना झाला. या सामन्यात धोनीच्या चेन्नईने बाजी मारली. आयपीएल २०२१ ही स्पर्धा हळूहळू रोमांचक वळणावर येऊन ठेपली आहे. दुसरीकडे बीसीसीआयनं यूएईत होणाऱ्या आयपीएलच्या उर्वरित सामन्यांसाठी काही शर्थी आणि अटींसह प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. त्याचबरोबर दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून संपूर्ण जग क्रिकेट आनंद घेत आहे. असं असताना अफगाणिस्तानमध्ये आयपीएल ब्रॉडकास्टींगवर बंधनं लादण्यात आली आहेत. तालिबानने लागू केलेल्या नव्या कायद्यामुळे आयपीएल दाखवण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे यूएईत होणाऱ्या आयपीएलचा आनंद अफगाणी नागरिकांना घेता येणार नाही

“आयपीएल कंटेन्ट इस्लाम विरोधी आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात ब्रॉडकास्टिंग होणार नाही. सामन्यादरम्यान चीअर लीडर्स नाचतात. हे इस्लामिक संस्कृतीच्या विरोधात आहे. तालिबानचा नवा कायदा महिलांना यासाठी परवानगी देत नाही. त्यामुळे तालिबानने आयपीएल ब्रॉडकास्टिंगवर बंदी आणली आहे”, असं तालिबानकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

आयपीएलमध्ये अफगाणिस्तानचे खेळाडूही सहभागी आहे. राशिद खान आणि मोहम्मद नबी या स्पर्धेत खेळत आहेत. तालिबानने अफगाणिस्तावर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर दोघंही देशाबाहेर राहात आहेत. दोन्ही खेळाडू सध्या युएईत आहेत. राशिद गेल्या काही दिवासात देशाला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रार्थना करण्याचं आव्हान करत आहेत. दुसरीकडे तालिबाननं पुरुषांना क्रिकेट खेळण्यावर कोणतीच बंधनं नसल्याचं सांगितलं आहे.

अफगाणिस्तानचा ताबा मिळवल्यानंतर तालिबानने महिला खेळाडूंवर बंदी घालण्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या निर्णयाचा विरोध केला असून अफगाणिस्तानात महिला क्रिकेटला समर्थन दिलं नाही तर पुरुष क्रिकेट संघासोबत होणारा प्रस्तावित सामना खेळणार नाही असा इशाराच दिला आहे. तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचे उपप्रमुख अहमदुल्लाह वासिक यांनी अफगाणिस्तानमधील महिलांना क्रिकेट सहित अन्य खेळांमध्ये भाग घेता येणार नाही असं जाहीर केलं आहे. अहमदुल्लाह वासिक यांनी स्थानिक माध्यामांशी संवाद साधतांना ही माहिती दिली आहे.

Story img Loader