देशांतर्गत क्रिकेटची सर्वात प्रतिष्ठित स्पर्धा म्हणजे रणजी करंडक सध्या सुरू आहे. या मोसमाच्या सुरुवातीच्या टप्प्यात एक अतिशय अनोखा विक्रम नोंदवला गेला, जो भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कधीही घडलेला नाही. तमिळनाडूच्या बाबा अपराजित आणि बाबा इंद्रजीत या जुळ्या भावांच्या जोडीने रणजी ट्रॉफीच्या ग्रुप एच एलिट सामन्यात मोठा पराक्रम केला. या दोघांनी छत्तीसगडविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्याच्या एकाच डावात शतके झळकावली. अशा प्रकारे एकाच संघासाठी एकाच सामन्यात शतक झळकावणारी जुळ्या भावांची ही पहिली भारतीय जोडी ठरली.
बाबा अपराजित आणि बाबा इंद्रजित या जुळ्या भावांनी गुरुवारी रणजी ट्रॉफीच्या या मोसमातील दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या दिवशी तामिळनाडूसाठी शतके झळकावली. बाबा इंद्रजीतने १२७ धावा केल्या, तर बाबाने अपराजित १०१ धावा केल्याय. दोघांच्या शानदार शतकांच्या जोरावर तामिळनाडूने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ४ बाद ३०८ धावा केल्या. दोन्ही भावांमध्ये झालेली तिसऱ्या विकेटसाठी २०७ धावांची भागीदारी खूप महत्त्वाची ठरली.
बाबा बंधूंनी एकाच सामन्यात शतक ठोकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही या दोघांनी एकाच सामन्यात शतके झळकावली आहेत. मात्र, त्यानंतर दोन्ही भाऊ वेगवेगळ्या संघातून खेळत होते. दुलीप ट्रॉफीमध्ये बाबा अपराजित इंडिया रेड आणि बाबा इंद्रजित इंडिया ग्रीनमधून खेळत होते.