Tamim Iqbal on Asia Cup 2023: एकीकडे भारतासहित सर्व आंतरराष्ट्रीय संघ आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या तयारीत व्यस्त आहेत, तर दुसरीकडे बांगलादेशमध्ये प्रचंड नाट्य सुरू आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर तमिम इक्बालने अचानक निवृत्ती घेतली होती. त्यानंतर अवघ्या एका दिवसात पुनरागमन करत आता कर्णधारपद सोडले आहे. एवढेच नाही तर तो आशिया कपमध्येही खेळणार नाही. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या यजमानपदी आशिया कप ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये खेळवला जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

३४ वर्षीय सलामीवीराने ढाका येथे बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी भेट घेतल्यानंतर दुखापतीच्या समस्येचे कारण देत आपला निर्णय जाहीर केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या त्याच्या यू-टर्ननंतर एका महिन्याच्या आत त्याने हा निर्णय घेतल्याने बांगलादेश क्रिकेटमध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न पडतो. बैठकीनंतर तमिम म्हणाला, “मी त्यांना (बीसीबी अधिकाऱ्यांना) कळवले आहे की, आजपासून मी बांगलादेश वन डे संघाचे कर्णधारपद सोडत आहे. मी दुखापतग्रस्त असल्याचे कारण दिले आहे.”

माजी कर्णधार तमीम पुढे म्हणाला, “मी नेहमीच संघाचा विचार आधी केला आहे. संघाच्या भल्यासाठी (मला वाटले) मी कर्णधारपद सोडले पाहिजे आणि एक खेळाडू म्हणून स्वतःच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा तेव्हा माझा सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला आहे आणि पुढेही करेन.” बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनाही त्याने त्याच्या निर्णयाची माहिती दिली आणि त्यांनी ती मान्य केली. जुलैमध्ये नुकत्याच झालेल्या मायदेशातील मालिकेदरम्यान तमिमने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, परंतु हसीनाच्या विनंतीवरून एका दिवसानंतर त्याने आपला निर्णय मागे घेतला होता.

हेही वाचा: Rishabh Pant: ऋषभ पंतने १४० kph वेगवान चेंडूवर मारला शानदार शॉट, २०२३ विश्वचषकापर्यंत संघात पुनरागमन का?

अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात आपल्या संघाचा १७ धावांनी पराभव झाल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा केल्याने अनुभवी सलामीवीराला अश्रू अनावर झाले होते. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजमुल हसन यांनी तमीमवर जाहीर टीका केली होती. तमिमने कबूल केले की, तो १०० टक्के तंदुरुस्त नाही, तरीही तो अफगाणिस्तानविरुद्धचा सामना खेळला. पंतप्रधान हसीना यांनी दुसर्‍या दिवशी तमीम आणि नजमुल यांना त्यांच्या घरी बोलावले आणि त्यांना आपला विचार बदलण्यास प्रवृत्त केले. तमीमला मात्र अफगाणिस्तानविरुद्धचे उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांना मुकावे लागले. त्याने दुखापतीतून सावरण्यासाठी सहा आठवड्यांचा ब्रेक घेतला.

तमिमने मालिकेतून माघार घेतल्यानंतर उरलेल्या अफगाणिस्तान वन डेत सलामीवीर लिटन दासने बांगलादेशचे नेतृत्व केले. बीसीबीचे क्रिकेट ऑपरेशन्सचे प्रमुख जलाल युनूस यांनी सांगितले की, “तमीमची डिस्कची दुखापत पूर्णपणे बरी झालेली नाही.” जलाल पुढे म्हणाले, “डॉक्टरांनी सुचवले आहे की, त्याला आशिया कपमध्ये खेळणे शक्य होणार नाही. तो न्यूझीलंड मालिका आणि विश्वचषकासाठी उपलब्ध असेल. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला सर्व प्रकारचा पाठिंबा आणि मदत दिली जाईल.”

हेही वाचा: World Cup 2023: पाकिस्तानचे नखरे अजूनही सुरूच! भारतात येण्यापूर्वी पीसीबीने ICCसमोर ठेवली अट; म्हणाले, “जर सुरक्षेची हमी…”

बीसीबीच्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “नवीन वनडे कर्णधाराचे नाव योग्य वेळी ठरवले जाईल. आशिया चषक खेळल्यानंतर बांगलादेश सप्टेंबरच्या अखेरीस तीन एकदिवसीय सामन्यांसाठी न्यूझीलंडला रवाना होणार आहे. ७ ऑक्टोबर रोजी धरमशाला येथे अफगाणिस्तानविरुद्ध भारतातील विश्वचषक मोहिमेची सुरुवात करतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tamim iqbal who returned from retirement resigned from the captaincy withdrew from asia cup 2023 as well avw
Show comments