Who is Tara Prasad: महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे कायमच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. त्यांनी नुकतेच त्यांच्या एक्स अकाउंटवर भारतीय वंशाची स्केटर तारा प्रसादचे कौतुक केले आहे. यानंतर, तारा देशभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. या पोस्टमध्ये आनंद महिंद्र यांनी २५ वर्षीय ताराने राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी आणि पुढे भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अमेरिकेचे नागरिकत्व कसे सोडले याबद्दल सांगितले आहे.

आनंद महिंद्रा यांची पोस्ट

आपल्या पोस्टबरोबर आनंद्र महिंद्रा यांनी एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आणि म्हणाले, “एका मित्राने काही दिवसांपूर्वी मला ही क्लिप पाठवली, तोपर्यंत मला तारा प्रसादच्या कामगिरीबद्दल काहीही कल्पाना नव्हती.”

“ताराने २०१९ मध्ये तिचे अमेरिकन नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व घेतले आहे. तेव्हापासून तिने तीन वेळा राष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली आहे”, असेही महिंद्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आम्ही तुझ्यासोबत आहोत…

आपल्या पोस्टच्या शेवटी आनंद महिंद्रा म्हणाले, “शाब्बास, तारा. मला आशा आहे की, तू हिवाळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये आघाडीवर आहेस. मला माहित आहे की गेल्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची तुझी संधी थोडक्यात हुकली होती पण तुझी नजर २०२६ मधील स्पर्धेवर आहे. तुझी स्वप्ने पूर्ण कर, आम्ही तुझ्यासोबत आहोत.”

तारा प्रसाद कोण आहे?

२४ फेब्रुवारी २००० रोजी जन्मलेल्या तारा प्रसादने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचे आणि भारताचे मोठे नाव केले आहे. तिने विविध आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. अमेरिकेत तामिळनाडूतील एका स्थलांतरित कुटुंबात जन्मलेल्या ताराने भारताकडून खेळता यावे म्हणून, अमेरिकेचे नागरिकत्वही सोडले आहे.

तीन वेळा जिंकली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा

ताराने २०२४ च्या रेकजाविक इंटरनॅशनल आणि २०२४ च्या स्केट सेल्जे या स्पर्धांमध्ये रौप्य पदके जिंकली आहेत. याचबरोबर तिने २०२२, २०२३ आणि २०२५ मध्ये तीन जेतेपदे पटकावत भारतीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धांमध्येही वर्चस्व गाजवले आहे. याव्यतिरिक्त, तिने फोर कॉन्टिनेंट्स फिगर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले असून, २०२२ आणि २०२३ मध्ये या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

Story img Loader