लंडन ऑलिम्पिकमध्ये मला पदकाचे स्वप्न साकार करता आले नाही, मात्र रिओ डी जानेरो (ब्राझील) येथे २०१६मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये हे ‘लक्ष्य’ साध्य करीन, असा विश्वास आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबत हिने व्यक्त केला.
राहीने नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्याबद्दल ‘लक्ष्य’ फाऊंडेशनतर्फे तिचा सत्कार करण्यात आला.  दक्षिण कोरियात मिळविलेल्या विश्वविजेतेपदाविषयी राही म्हणाली, ‘‘अंतिम फेरीत स्थान मिळविल्यानंतर माझे रौप्यपदक निश्चित आहे, याची मला कल्पना होती. मात्र माझी प्रतिस्पर्धी कोरियन खेळाडू कियानगेई किम हिने केलेल्या नेत्रदीपक कामगिरीनंतर स्थानिक प्रेक्षकांनी टाळय़ांच्या कडकडाटात तिला प्रोत्साहन दिले. आपण तिच्यापेक्षा चांगली कामगिरी केली पाहिजे, अशी खूणगाठ बांधूनच मी सर्वोत्तम कामगिरी करीत तिला मागे टाकले आणि सोनेरी वेध घेतला. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय नवीन नियमावलीनुसार झाल्यामुळे थोडेसे दडपण होते, मात्र विजेतेपद मिळाल्यामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे.’’
शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीबाबत ‘लक्ष्य’ फाऊंडेशन माझी योग्य रीतीने काळजी घेत आहे, त्यामुळेच मी या यशापर्यंत पोहोचले आहे, असेही राही हिने सांगितले. शासनातर्फे राही व अन्य नेमबाजांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी या वेळी दिले.

Story img Loader