Starting: IPL 2022 GT vs RR Final Playing 11 : जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. आपल्या पहिल्याच हंगामामध्ये थेट अंतिम सामन्यात धडक मारलेल्या गुजरात टायटन्सची लढत राजस्थान रॉयल्ससोबत होणार आहे. गुजरातने क्वॉलिफायर १ सामन्यात राजस्थानचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. तर, क्लॉलिफायर २ दोन लढतीमध्ये राजस्थानने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव केला होता. अंतिम सामन्यात पोहचलेले दोन्ही संघ तुल्यबळ समजले जात असून सर्वांना रंगतदार लढतीची अपेक्षा आहे. दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या या सामन्यादरम्यान खेळपट्टी आणि हवामान मोठी भूमिका बजावू शकते.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा हा या आयपीएल हंगामातील दुसरा सामना ठरणार आहे. या स्टेडियमची खेळपट्टी सामान्यपणे फलंदाजीसाठी अनुकूल आहे. मात्र, २७ मे रोजी झालेल्या क्वॉलिफायर सामन्यात खेळपट्टीत काहीसा बदल दिसला होता. या मैदानावर आतापर्यंत झालेल्या टी ट्वेंटी सामन्यांतील पहिल्या डावातील धावसंख्येची सरासरी १७४ आहे. तर, दुसऱ्या डावात धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या १६६ आहे. याशिवाय ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करेल अशी अपेक्षा आहे. राजस्थान रॉयल्स आणि आरसीबी यांच्यातील क्वॉलिफायर सामन्यात वेगवान गोलंदाजांना ९ बळी मिळाले होते. त्यामुळे अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ क्षेत्ररक्षणाला प्राधान्य देण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अहमदाबाद शहराचे तापमान आज दिवसभरात ४२ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. रात्रीच्यावेळी तापमानात घट होईल आणि २९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण होईल. आज अहमदाबादमध्ये पावसाचा अंदाज फक्त एक टक्का आहे. या दरम्यान ताशी १८ ते २१ किमी वेगाने वारे वाहतील तर आर्द्रतेचे प्रमाण ७० टक्के असेल. म्हणजेच आजच्या अंतिम सामन्यादरम्यान भरपूर आर्द्रता असेल.
संभाव्य संघ
गुजरात टायटन्स : शुभमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), मॅथ्यू वेड, हार्दिक पंड्या (कर्णधार), डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान, अल्झारी जोसेफ, आर साई किशोर, मोहम्मद शामी, यश दयाल
राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, यशस्वी जैयस्वाल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक आणि कर्णधार), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, ओबेड मॅकॉय, युझवेंद्र चहल