अभिषेक तेली

मुंबई : तरुणाईचा सळसळता उत्साह, ज्येष्ठ नागरिकांची जिद्द आणि दिव्यांगांची प्रेरणादायी धाव मुंबईच्या रस्त्यांवर रविवारी उमटली. जगभरात प्रतिष्ठेची मानली जाणारी आणि धावपळीच्या जीवनात मुंबईकरांना सुदृढ आरोग्याचा मार्ग दाखविणारी ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४’ ही स्पर्धा रविवार आयोजित करण्यात आली होती. ‘हर दिल मुंबई’चा नारा देत हजारो मुंबईकर आणि जगभरातील धावपटू यात सहभागी झाले होते. या धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी ध्वनीक्षेपकावर गाणीही वाजविण्यात आली, तसेच मुंबई पोलीस बॅण्डनेही सादरीकरण केले. तर ‘ड्रीम रन’ या गटात विविध सामाजिक संस्था, व्यावसायिक संस्था व नागरिकांनी सामाजिक संदेश देणारे फलक हाती घेत आणि वैशिष्टय़पूर्ण वेशभूषा परिधान करीत सर्वाचेच लक्ष वेधून घेतले.

मुंबई मॅरेथॉनचे यंदा १९वे वर्ष होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तसेच सुरक्षा दलांचे जवानही तैनात होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ते वाहतुकीत बदल करण्यासह जादा लोकल रेल्वेच्या फेऱ्याही सोडण्यात आल्या होत्या. मॅरेथॉनस्थळी येण्यासाठी बहुसंख्य मुंबईकरांनी लोकल रेल्वेनेच प्रवास करणे पसंत केले आणि पहाटेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) गाठले. त्यामुळे एरव्ही कार्यालयात जाण्याच्या गडबडीने भरलेली लोकल रेल्वे रविवारी मात्र धावपटूंच्या उत्साही लगबगीने भरली होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मॅरेथॉनबाबत उत्सुकता फुलली होती, गप्पांचे-चर्चाचे फडही रंगले. 

हेही वाचा >>>रेल्वे स्थानकावर झोप, ४.२ किलोमीटरची मॅरेथॉन अन् समाप्त रेषेजवळ योगासने, सुरतमधील ७६ वर्षीय नरेश तालिया यांनी लक्ष वेधले

यंदाच्या मॅरेथॉनला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, अन्न नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, भाजप आमदार आशीष शेलार, गिरीश महाजन आदी राजकीय मंडळी उपस्थित होती. 

रामनामाचा गजर

देशभरातील वातावरण राममय झाले असताना ‘टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४’ या स्पर्धेतही रामनामाचा गजर झाला. श्रीरामाची प्रतिमा असलेले भगवे झेंडे खांद्यावर घेऊन तसेच फलक हातात घेऊन काही धावपटू धावले.

हेही वाचा >>>रामभक्त केशव महाराजचा ‘जय श्रीराम’चा नारा, VIDEO शेअर करत दिल्या अयोध्येतील सोहळ्यासाठी शुभेच्छा

पुरुषांच्या समर्थनार्थ अनोखी जनजागृती

मॅरेथॉनच्या मार्गावर ‘बीवी सताए, हमें बताएं’ अशा आशयाचे फलक हातात घेऊन उभे राहणाऱ्या न्याय प्रयास फाऊंडेशनच्या सदस्यांनी सर्वाचेच लक्ष वेधून घेतले. ‘आम्ही न्याय प्रयास फाऊंडेशनतर्फे खोटय़ा गुन्ह्यांविरोधात जनजागृती करतो, महिलांकडून कायद्याचा होणारा चुकीचा वापर बंद झाला पाहिजे. आपल्या देशात महिलांना वाचविण्यासाठी कायद्याची आवश्यकता आहे, पण जेव्हा या कायद्याचा दुरूपयोग होतो, तेव्हा तो थांबविण्यासाठी कोणीही आवाज उठवत नाही. आम्ही पीडित पतीला व त्याच्या कुटुंबीयांना कायदेशीर सल्ला आणि समुपदेशन करतो,’ असे फाऊंडेशनच्या सदस्यांनी सांगितले.

हातमागावर विणलेल्या साडय़ा नेसून महिला धावल्या

मुंबई मॅरेथॉनमध्ये काही महिला चक्क साडी नेसून धावल्या. भारतीय संस्कृती जपत भारतीय उत्पादनाचा प्रसार करण्यासाठी लघू उद्योजिका तंद्रा चक्रवर्ती यांच्या समूहातील २० महिला चक्क हातमागावर विणलेली साडी नेसून मुंबई मॅरेथॉनमध्ये धावल्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मेट्रो सिनेमा या मार्गावरची ५.९ किलोमीटरची ‘ड्रीम रन’ मॅरेथॉन २० महिलांनी हातमागावर विणलेली साडी नेसून पूर्ण केली. तंद्रा चक्रवर्ती या लघू उद्योजिका असून ‘डाणा’ या स्वत:च्या ब्रॅण्डअंतर्गत त्या हातमागावर विणलेल्या साडय़ा तयार करतात.

Story img Loader