ज्ञानेश भुरे
पुणे : नेदरलॅंड्सच्या टॅलन ग्रीक्सपूरने अत्यंत चुरशीच्या लढतीत फ्रान्सच्या बेंजामिन बोन्झीचे आव्हान तीन सेटमध्ये परतवून लावताना टाटा खुल्या महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. ग्रीक्सपूरचे कारकीर्दीमधील एटीपी २५०च्या मालिकेतील हे पहिलेच विजेतेपद ठरले. दुहेरीत बेल्जियमची सॅण्डर गिले-जोरान व्लिजेन जोडी विजेती ठरली.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात शनिवारी झालेल्या एकेरीच्या अंतिम लढतीत ग्रीक्सपूरने वेगवान सव्र्हिसच्या जोरावर फ्रान्सच्या बेंजामिन बोन्झीचे आव्हान ४-६, ७-५, ६-३ असे मोडून काढले. ही लढत २ तास १६ मिनिटे चालली. अंतिम लढतीत भारताचा खेळाडू नसतानाही पुणेकर टेनिस चाहत्यांनी दोन्ही खेळाडूंना दिलेला प्रतिसाद अभूतपूर्व होता.
वेगवान आणि अचूक सव्र्हिस हेच ग्रीक्सपूरच्या विजयाचे वैशिष्टय़ राहिले. बोन्झीने दहाव्या गेमला ब्रेकची संधी साधून पहिला सेट जिंकला. पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटला ११व्या गेमला ब्रेकची संधी साधून ग्रीक्सपूरने आघाडी घेतली आणि नंतर १२व्या गेमला आपली सव्र्हिस राखत दुसरा सेट जिंकला. एक सेटच्या बरोबरीनंतर तिसऱ्या सेटला ग्रीक्सपूर अधिक आत्मविश्वासाने आणि आक्रमक खेळला. तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये सुरुवातीला आणि शेवटी नवव्या गेमला ब्रेकची संधी साधून ग्रीक्सपूरने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
ग्रीक्सपूरने लढतीत १७ बिनतोड सव्र्हिस केल्या. बोन्झीनेदेखील ११ बिनतोड सव्र्हिस करताना आपले आव्हान राखण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचूकतेच्या आघाडीवर ग्रीक्सपूरने बाजी मारली. ग्रीक्सपूरला संपूर्ण लढतीत ब्रेकच्या सात संधी मिळाल्या. त्यापैकी ग्रीक्सपूरने तीन संधी साधल्या. बोन्झीला चारच संधी मिळाल्या. त्यापैकी त्याने एकच संधी साधली.
दुहेरीत बालाजी, नेंदुचेझियन उपविजेते
स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या भारताच्या एम. बालाजी-जीवन नेंदुचेझियन जोडीला अखेर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बेल्जियमच्या सॅण्डर गिले-जोरान व्लिजेन जोडीने भारतीय जोडीचा सरळ सेटमध्ये ६-४, ६-४ असा पराभव केला. ही लढत १ तास १० मिनिटे चालली. बालाजी आणि नेंदुचेझियनच्या खेळात अचूकतेचा अभाव होता. त्यांचे अनेक फटके नेटमध्ये अडकत हेते. त्याचा फटका त्यांना बसला. तुलनेत बेल्जियम जोडीने केवळ सव्र्हिसच नाही, तर परतीचे फटकेही अचूक मारले. त्यांच्या ताकदवान फटक्यांचा सामना भारताच्या बालाजी-नेंदुचेझियन जोडीला करता आला नाही.