भारत आणि चीन यांच्यात गलवान खोऱ्यात सुरु असलेल्या संघर्षानंतर बीसीसीआयने आयपीएलचे प्रमुख स्पॉन्सर असलेल्या VIVO या चिनी मोबाईल कंपनीसोबतचा करार वर्षभरासाठी स्थगित केला. यानंतर तेराव्या हंगामासाठी बीसीसीआय नवीन स्पॉन्सरच्या शोधात आहे. आतापर्यंत Jio, Byju’s, Amazon, Coca Cola, Patanjali यासारखे ब्रँड स्पॉन्सरशिपच्या शर्यतीत होते. Outlook ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार Tata Sons कंपनीनेही आयपीएलच्या स्पॉन्सरशिपसाठी निवीदा दाखल केली आहे. इतकच नव्हे तर तेराव्या हंगामाची स्पॉन्सरशिप Tata Sons ला जाण्याची दाट शक्यता असल्याचीही माहिती मिळतेय.
अवश्य वाचा – गांगुली-जय शहा यांना दिलासा, अध्यक्षपदाच्या याचिकेवर १७ ऑगस्टला निर्णय नाही
१८ ऑगस्ट रोजी बीसीसीआय आयपीएलच्या नव्या स्पॉन्सर बद्दल घोषणा करणार आहे. ३१ डिसेंबरपर्यंत नवीन स्पॉन्सरसोबतचा करार असणार आहे. यासाठी बीसीसीआयने काही नियम आखून दिले असून वार्षिक ३०० कोटींची उलाढाल असलेल्या कंपनीनेच स्पॉन्सरशिपसाठी अर्ज करावा अशी अट घालण्यात आली आहे. याआधी Tata कंपनीने कधीही एखाद्या क्रिकेट स्पर्धेला प्रायोजकत्व दिलेलं नाही. परंतू भारत-चीन संघर्षामुळे देशात तयार झालेलं वातावरण आणि टाटा उद्योगसमुहाची अस्सल भारतीय कंपनी म्हणून असलेली छबी पाहता तेराव्या हंगामासाठी Tata Sons कंपनीचं पारडं जड असल्याचं मानलं जातंय.
आतापर्यंत आयपीएलच्या तेराव्या हंगामााठी ५ कंपन्यांनी आपली निवीदा दाखल केली आहे. ज्यात Tata Sons, Unacademy, Jio आणि Patanjali हे ४ ब्रँड भारतीय आहेत. चिनी गंतुवणूक असलेली Byju’s या कंपनीनेही स्पॉन्सरशिपसाठी निवीदा दाखल केली आहे. Tata उद्योगसमुहाने आतापर्यंत कुस्ती, फुटबॉल यासारख्या खेळात गुंतवणूक केली असली तरीही क्रिकेटमध्ये गुंतवणूक करण्याचा टाटा उद्योगसमुहाचा हा पहिलाच प्रयत्न असणार आहे. भारत आणि जगभरात टाटा उद्योगसमुहाचं नाव लक्षात घेता या कराराबद्दल फार गुप्तता पाळली जात आहे. त्यामुळे १८ तारखेला स्पॉन्सरशिपचे हक्क कोणत्या कंपनीला मिळतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.