क्रिकेटच्या पंढरीतील ‘देव’ अर्थात सचिन तेंडुलकर आणि त्याचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं नातं सर्वश्रुत आहे. आचरेकर सरांनी केलेल्या संस्कारांचे दर्शन सचिनच्या कृतीतून वारंवार घडते. देशभरात आज शिक्षक दिन साजरा केला जातोय. या पार्श्वभूमीवर सचिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आचरेकर सरांची आठवण सांगणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

शारदाश्रम शाळेच्या ज्युनिअर क्रिकेट संघाकडून सचिन खेळायचा. यावेळी सचिनला प्रशिक्षण देणाऱ्या आचरेकर सरांनी त्याच्यासाठी खास एका सराव सामन्याचं आयोजन केलं होतं. त्याचवेळी सचिनचा सिनिअर संघ वानखेडे मैदानावर हॅरिस शिल्डचा सामना खेळत होता. लहानपणी खोडकर असलेला सचिन आचरेकर सरांचा आदेश धुडकावून सिनिअर संघाचा सामना बघायला गेला. हे आचरेकर सरांना समजलं. त्यानंतर नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी सचिनचा हा व्हिडीओ नक्की पाहा.

“सर मला सर्वांसमोर ओरडले. तुला दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवण्याची गरज नाही. आधी स्वतःचा खेळ सुधार, मग लोक तुझ्यासाठी टाळ्या वाजवायला येतील. तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा धडा होता, यानंतर मी एकही सामना चुकवला नाही”, असं म्हणत सचिननं शिक्षक दिनानिमित्त आठवणींना उजाळा दिला. ज्या वानखेडे मैदानावर आचरेकर सर सचिनला सर्वांसमोर ओरडले, त्याच मैदानावर सचिनने २०११ चा विश्वचषक जिंकत आपल्या सरांचं स्वप्न साकारलं. सध्या सचिनच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळतोय.

Story img Loader