KL Rahul and Shreyas Iyer, Asia Cup 2023: यंदाचा विश्वचषक हा भारतात होणार असून त्यासाठी फक्त दोन महिने आता शिल्लक राहिले आहेत. विश्वचषक २०२३ सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही मात्र, अजूनही संघात कोणाला घ्यायचे याची चाचपणी सुरु आहे. पण त्याआधी भारतीय क्रिकेट संघाला आशिया चषक २०२३ही खेळायचे आहे. त्यासाठी दुखापतग्रस्त खेळाडूंच्या बाबतीतील निर्णय घेतला जाणार आहे. दुसरीकडे, के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांची या आठवड्यात फिटनेस चाचणी होईल आणि त्या आधारावर त्यांना संघात स्थान मिळणार की नाही याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. यानंतर अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील समिती सोमवारपर्यंत आशिया चषक २०२३ संघाची घोषणा करेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला सांगितले की, “आम्ही काही खेळाडूंच्या दुखापतींबाबतीतील रिपोर्टच्या अपडेटची वाट पाहत आहोत. त्यात के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्याही रिपोर्टचा समावेश आहे. ते दोघेही मागील अहवालानानुसार ८० टक्के तंदुरुस्त आहेत पण अजूनही त्यांनी कुठलाही सराव सामना खेळलेला नाही. आम्हाला शनिवारपर्यंत मूल्यांकन अहवाल अपेक्षित आहे. आमच्याकडे अधिक स्पष्टता आल्यावर संघाची घोषणा केली जाईल.”

के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यरसाठी ही समाधानाची बाब आहे की त्यांचे अजूनही आशिया चषक संघ निवडीमध्ये विचाराधीन आहे. मात्र, बीसीसीआय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरने टीम इंडियाचा प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्माला सांगितले की, “त्यांनी या स्टार जोडीशिवाय आशिया कप २०२३ची योजना करावी.” आगरकर सलील अंकोलासह संघासह बार्बाडोसमध्ये उपस्थित होते. दोघांनी रोहित आणि राहुलसोबत आशिया कप कॉम्बिनेशन आणि संघ निवडीवर चर्चा केली.

हेही वाचा: राहुल, श्रेयसच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रमच!

बीसीसीआयच्या त्याच अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “अजितने रोहित आणि राहुल यांची भेट घेतली आणि आशिया चषक स्पर्धेच्या योजनांबाबत सविस्तर चर्चा केली. के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर या दोघांबाबत ५०-५० टक्के आशावादी आहोत. मात्र, जर त्यांना संघात पुनरागमन करण्यासाठी अजूनही काही दिवस लागणार असतील तर संघ व्यवस्थापनाने सूर्या आणि संजूला वन डेमध्ये पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय घेतला जाईल.”

आशिया चषक २०२३ पेक्षा राहुल आणि श्रेयस तोपर्यंत तंदुरुस्त होतील की नाही याची चिंता अधिक आहे. दोघेही २४ ते २९ ऑगस्ट दरम्यान बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आशिया चषक शिबिरात असतील. त्यावेळी सर्व बीसीसीआय निवड समितीचे सदस्य त्याठिकाणी उपस्थित असतील या दोघांचे मूल्यांकन करतील. जरी आशिया चषक संघ सादर करण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट असली तरी तांत्रिक समितीच्या मान्यतेनंतर उशिराने बदल होऊ शकतात. २ सप्टेंबरला भारताची पाकिस्तानशी लढत होणार असल्याने ७ दिवस उशिराने बदल शक्य आहे. ही भारताच्या दृष्टीने समाधानकारक बाब आहे.

हेही वाचा: चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा : भारताची विजयी सलामी

विश्वचषकापर्यंत के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर फिट होतील का?

भारतीय संघाला अजूनही मिडल ऑर्डर बॅटिंग लाईन अपची समस्या सतावते आहे. के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यरच्या पुनरागमनानंतर मधल्या फळीचा प्रश्न सुटू शकेल, असे मानले जात होते. पण आता प्रश्न असा आहे की, लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर विश्वचषकापर्यंत फिट होतील का? जर के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त होऊ शकले नाहीत, तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी तो मोठा धक्का ठरू शकतो. सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. टीम इंडियाने कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजचा पराभव केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team for asia cup 2023 will be announced on monday waiting for fitness report of kl rahul and shreyas iyer avw