Ahmed Shehzad on Team India: पाकिस्तानचा विराट कोहली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमद शहजादने भारतीय संघाबाबत बेताल वक्तव्य केले आहे. शहजादने भारतीय संघात चांगल्या गोलंदाजांची कमतरता असल्याचे म्हटले आहे तसेच, सध्या कसोटीत रविचंद्रन अश्विन आणि वन डे क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेला मोहम्मद सिराज हे दोनच सध्या टीम इंडियाचे गोलंदाज फॉर्म मध्ये आहेत. भारताचा रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहही कसोटी क्रमवारीत पहिल्या दहामध्ये आहेत पण गेल्या एक वर्षापासून जसप्रीत संघापासून लांब आहे.
अहमद शहजादने नादिर अलीच्या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की, “भारताकडे रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजासारखे गोलंदाज आहेत, परंतु माझ्यामते ते धोकादायक नाहीत. ऐतिहासिकदृष्ट्या जागतिक दर्जाचे वेगवान गोलंदाज तयार करणाऱ्या पाकिस्तान संघाशी त्यांची तुलना होऊ शकत नाही.” तो पुढे म्हणाला की, “भारत गेल्या काही वर्षांत महान फलंदाज निर्माण करू शकला आहे आणि फलंदाजांना संघ व्यवस्थापनाकडून भरपूर पाठिंबा मिळाला आहे. मात्र, गोलंदाजांना हवा तेवढा पाठिंबा मिळू शकला नाही.”
शहजादने भारतीय गोलंदाजांबद्दल पुढे सांगितले की, “त्यांच्याबद्दल अनादर नाही. पण भारताकडून असा धोकादायक गोलंदाज झालेला नाही, ज्याचा सामना करण्यास विरोधी फलंदाज थोडे द्विधा मनस्थितीत जात असतील. त्यांच्याकडे बुमराह, जडेजा आणि अश्विनसारखे चांगले गोलंदाज आहेत, पण ते एक साधारण प्रकारची गोलंदाजी करतात. बुमराह, शमी असूनही भारताकडे एकही गोलंदाज नाही ज्याला विरोधी संघातील फलंदाज घाबरत असेल.”
शहजादने सामना केलेल्या सर्वात धोकादायक गोलंदाजाबद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला की, “ मी यात महान वेगवान गोलंदाज शोएब अख्तरची निवड करेन. त्याने नेटमध्ये अख्तरचा सामना करताना त्याचे अनुभव शेअर केले.” अख्तरची गोलंदाजी किती शिस्तबद्ध होती आणि कोणत्याही फलंदाजाला कधीही दुखापत होणार नाही याची काळजी कशी घेतली याबद्दल त्याने सांगितले.
शहजाद म्हणाला, “मला शोएब अख्तरशिवाय दुसरा कोणताच गोलंदाज आठवत नाही. जेव्हा मी संघात नवीन होतो तेव्हा तो शोएब अख्तर आधीच होता. त्यामुळे मी जुन्या रिव्हर्स स्विंगिंग चेंडूने अख्तरविरुद्ध सहा-आठ चेंडू खेळले आहेत त्यांचा सामना केला आहे.” तो पुढे म्हणाला, “त्याच्यात दोन उत्तम गुण होते. पहिला, त्याने नेटमध्ये कधीच नो-बॉल टाकला नाही आणि दुसरा, त्याने कधीही नेटमध्ये फलंदाजांना अनावश्यक बाऊन्सर टाकले नाहीत. त्याला माहित होते की फलंदाजाला दुखापत होईल.”
शहजादचा भारताविरुद्धचा विक्रम कसा आहे?
अहमद शहजादने भारतीय गोलंदाज धोकादायक नसल्याचं म्हटलं असेल, पण भारताविरुद्ध शहजादचा विक्रम वेगळीच गोष्ट सांगतो. शहजादने भारतीय संघाविरुद्ध सात डाव खेळले आहेत, मात्र त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. भारताविरुद्धच्या सात डावांत त्याने २६.२८च्या माफक सरासरीने १८४ धावा केल्या आहेत. त्याची सर्वात मोठी धावसंख्या ४७ धावा आहे. शहजादने भारताविरुद्ध एकही कसोटी सामना खेळलेला नाही, पण टी२० आणि एकदिवसीयमध्ये त्याचा स्ट्राइक रेट ८३.६३ आहे. भारताविरुद्ध केवळ १८४ धावा करणाऱ्या शहजादने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.