Rohit Sharma’s video at Mumbai airport is viral on social media: रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. भारत या स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीत पोहोचणारा संघ ठरला. टीम इंडियाने गुरुवारी (०२ नोव्हेंबर) श्रीलंकेचा पराभव करत स्पर्धेत सलग सातवा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. आता भारतीय कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो विश्वचषकाबद्दल एका चाहत्याच्या प्रश्नाला मनोरंजक उत्तर देताना दिसत आहे.

व्हायरल झालेला व्हिडीओ विमानतळावरील आहे, जिथून रोहित शर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुढील सामन्यासाठी कोलकात्याला रवाना होत आहे. दरम्यान, एका चाहत्याने भारतीय कर्णधाराला विचारले, “वर्ल्ड कप आपला आहे ना?” रोहित शर्माने चाहत्यांच्या प्रश्नाला दिलखुलास उत्तर दिले आणि म्हणाला, ‘अजून वेळ आहे.’

विश्वचषकातील श्रीलंकेचा दुसरा सर्वात मोठा पराभव –

गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेचा ३०२ धावांनी पराभव केला, जो विश्वचषकाच्या इतिहासातील धावांच्या बाबतीत दुसरा सर्वात मोठा पराभव होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ८ गडी गमावून ३५७ धावा केल्या होत्या. संघाकडून शुबमन गिलने ९२, विराट कोहलीने ८८ आणि श्रेयस अय्यरने ८२ धावांची खेळी केली.लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला अवघ्या ५५ धावांत गुंडाळले. यादरम्यान भारताकडून मोहम्मद शमीने ५, मोहम्मद सिराजने ३, बुमराह आणि जडेजाने १-१ विकेट घेतल्या.

हेही वाचा – IPL 2024: मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी घेतला मोठा निर्णय, एलएसजीच्या अष्टपैलू खेळाडूला केले करारबद्ध

भारताला अजून दोन साखळी सामने खेळायचे आहेत, ज्यामध्ये त्याचा सामना ५ नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेशी होईल. त्यानंतर १२ ऑक्टोबरला हा संघ नेदरलँडशी सामना करेल. मात्र, टीम इंडियाने ७ सामने जिंकून १४ गुणांसह उपांत्य फेरी गाठली आहे. तसेच या विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला आहे.

Story img Loader