भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया आणि सचिव अनुराग ठाकूर यांच्यात सोमवारी झालेल्या बैठकीनंतर ६ जूनला भारताच्या प्रशिक्षकाची निवड जाहीर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बांगलादेश दौऱ्यावर जाण्याच्या आदल्या दिवशी संघ संचालकांसह सहयोगी प्रशिक्षकांची निवड निश्चित होणार आहे.

‘‘भारतीय संघ ५ जूनला कोलकाता येथे दाखल होणार आहे. ६ जूनला खेळाडूंची तंदुरुस्ती चाचणी होईल, तर ७ जूनला भारतीय संघ बांगलादेशला रवाना होईल. त्याआधी संघ संचालक आणि सहयोगींची निवड जाहीर होईल,’’ असे ठाकूर यांनी सांगितले. या भेटीच्या वेळी आयपीएलचे प्रमुख राजीव शुक्ला ठाकूर यांच्यासोबत होते.

सौरवच्या नियुक्तीबाबत अद्याप निर्णय नाही!
भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे माजी कर्णधार सौरव गांगुली स्वीकारणार असल्याची चर्चा क्रिकेटवर्तुळात होती. परंतु सौरवच्या नियुक्तीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी स्पष्टोक्ती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली. भारतीय क्रिकेट संघाच्या सल्लागार समितीचा प्रमुख, उच्च कामगिरी व्यवस्थापक, संघ संचालक किंवा मुख्य प्रशिक्षक होणार अशी जोरदार चर्चा सध्या होत आहे. याबाबत ठाकूर म्हणाले, ‘‘गांगुली यांनी भारतीय क्रिकेटला खूप मोठे योगदान दिले आहे. तो महान क्रिकेटपटू आहे. भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी योग्य तो निर्णय आम्ही लवकरच घेऊ. सौरवच्या नियुक्तीबाबत प्रसारमाध्यमांमध्ये काही चर्चा होत आहे. आम्हाला निर्णय घ्यायला काही अवधी द्यावा.’’

समझोता करारानंतर भारत-पाकिस्तान मालिका
भारत-पाकिस्तान यांच्यातील मालिका पुन्हा सुरू होण्याआधी दोन्ही संघांमध्ये समझोता करार होण्याची आवश्यकता असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. ‘‘पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रमुख शहरियार खान यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष दालमिया आणि माझी भेट घेतली. या बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा झाली. यासंदर्भातील करारावर स्वाक्षरी झाल्यावर आम्ही औपचारिक घोषणा करू आणि त्यानंतर दौरा होऊ शकेल.’’

Story img Loader