Indian team is number one in all three formats of ICC : भारताने इंग्लंविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका ४-१ जिंकल्याने मोठा फायदा झाला आहे. या विजयासह रोहित शर्माचा संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तो आधीच टी-२० आणि वनडेमध्ये अव्वल होता. अशाप्रकारे भारत एकाच वेळी तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनला आहे. यापूर्वी डिसेंबरमध्येही टीम इंडियाने अशी कामगिरी केली होती आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनले होते. मात्र, आता टीम इंडियाने एकाचवेळी तिन्ही क्रमावारीसह डब्ल्यूटीसीमध्ये अव्वल स्थान पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडिया अव्वल –
त्यावेळी, भारतीय संघ आधीच कसोटी आणि टी-२० मध्ये पहिल्या क्रमांकावर होता आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत २-१ असा विजय मिळवल्यानंतर, त्याने आयसीसी क्रमवारीत एकदिवसीय क्रिकेटमध्येही पहिले स्थान मिळवले होते. तथापि, एकदिवसीय मालिकेनंतर लगेचच दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवल्यानंतर भारताने पहिला कसोटीतील पहिले स्थान गमावले होते. तेव्हा ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या स्थानावर विराजमान झाला होता. आता विशाखापट्टणम, राजकोट, रांची आणि धरमशाला कसोटीत इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया पुन्हा एकदा कसोटीतील नंबर वन टीम बनली आहे. भारताने तिन्ही फॉरमॅटमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे.
आयसीसीची ताजी क्रमवारी –
रविवारी आयसीसीने आपल्या ताज्या अपडेटमध्ये सांगितले की, हैदराबादमधील पहिली कसोटी २८ धावांच्या जवळच्या फरकाने गमावल्यानंतर, भारताने शानदार पुनरागमन केले आणि इंग्लंडविरुद्ध उर्वरित चार कसोटी सामने जिंकले. विझाग, राजकोट, रांची आणि आता धरमशाला येथे विजय मिळवून संघ आयसीसी कसोटी संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर परतला आहे. या मालिकेतील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना ऑस्ट्रेलियाला मागे टाकण्यास मदत झाली आहे.
हेही वाचा – Mohammed Shami : शमीला वाढत्या वयात फिटनेस कसा राखायचा अँडरसनकडून शिकायला हवे, माजी दिग्गजाचा सल्ला
कसोटी क्रमवारीत संघाचे आता १२२ रेटिंग गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ ११७ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड १११ रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. आता ख्राईस्टचर्चमध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटीच्या निकालाने काही फरक पडणार नाही आणि भारत कसोटीत पहिल्या क्रमांकावर राहील. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ चे विजेते ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.
डब्ल्यूटीसी क्रमवारीतही टीम इंडिया अव्वल –
कसोटीत पहिल्या क्रमांकावर राहिल्याने भारत आता तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रमवारीत शिखरावर पोहोचला आहे. एकदिवसीय क्रमवारीत त्यांचे १२१ रेटिंग गुण आहेत, ऑस्ट्रेलिया ११८ रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे २६६ रेटिंग गुण आहेत, तर इंग्लंड (२५६) दुसऱ्या स्थानावर आहे. याआधी, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवल्यानंतर भारताची कसोटी संघ क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर घसरण झाली होती.
हेही वाचा – IND vs ENG : निवृत्तीच्या प्रश्नावर रोहित शर्माने सोडले मौन, हिटमॅनने सांगितले कधी ठोकणार क्रिकेटला राम-राम?
मायदेशात पाकिस्तानविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप करून ऑस्ट्रेलियाने कसोटी क्रमवारीत भारताला मागे टाकले होते. आता टीम इंडिया पुन्हा एकदा अव्वल स्थानावर पोहोचली आहे. भारत ६८.५१ गुणांच्या टक्केवारीसह आयसीसी डब्ल्यूटीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.