Team India depended on New Zealand vs Australia match to reach the semi finals : महिला टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये भारताला मोठा झटका बसला, जेव्हा त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवला असला, तरी स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमधून उपांत्य फेरी गाठणे अजूनही भारतासाठी खूप कठीण आहे. कारण पुढील फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाचे भवितव्य मंगळवारी होणाऱ्या न्यूझीलंडचा-ऑस्ट्रेलिया सामन्यावर अवलंबून आहे. त्यामुळे भारताला उपांत्य फेरी गाठण्यासाठी नक्की समीकरण कसं आहे? जाणून घेऊया.

पुढील फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला या सामन्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. भारताला आपल्या आशा जिवंत ठेवण्यासाठी न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला पराभूत करणे अपेक्षित आहे. कारण भारताने महिला टी-२० विश्वचषकाच्या गट टप्प्यातील उर्वरित सामने जिंकले, तरी ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील याची खात्री नाही. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे भारतीय संघाचा खराब नेट रन रेट -१.२१७ आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचे संघ सध्या या स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत. ऑस्ट्रेलियाचा नेट रन रेट +१.९०८ आहे आणि न्यूझीलंडचा नेट रन रेट +२.९०० आहे.

न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला हरवले तर…

न्यूझीलंडने बाकीचे सर्व सामने जिंकले असे समजा. ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर, किवी चार सामन्यांतून चार विजय मिळवून त्यांच्या गटात अव्वल स्थान मिळवतील आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. यानंतर उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाचा पराभव करून उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १३ ऑक्टोबरला सामना होणार आहे. त्याआधी टीम इंडियाला ९ ऑक्टोबरला श्रीलंकेविरुद्धही विजय मिळवावा लागणार आहे. या स्थितीत भारताचे चार सामन्यांत तीन विजय होतील, तर ऑस्ट्रेलियन संघाचे चार सामन्यांत केवळ दोनच विजय होतील.

हेही वाचा – Arundhati Reddy : टीम इंडियाला मोठा धक्का! आयसीसीने ‘या’ स्टार खेळाडूवर केली मोठी कारवाई

ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला हरवले तर…

ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला हरवल्यास भारताच्या पात्रता फेरीच्या शक्यतांना मोठा धक्का बसेल. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही देशांचा नेट रन रेट भारतापेक्षा चांगला आहे आणि त्यामुळे हरमनप्रीतच्या संघाला पुढील फेरीसाठी पात्र होण्यासाठी मोठी उलथापालथ घडवून आणावी लागेल. ऑस्ट्रेलियाने-न्यूझीलंडच्या हेड-टू-हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर दोन्ही संघांनी २००६ पासून आतापर्यंत ५१ महिला टी-२० सामने खेळले आहेत. यापैकी न्यूझीलंडने २१ आणि ऑस्ट्रेलियाने २८ सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला हरवल्यास भारताला ऑस्ट्रेलियाला कोणत्याही परिस्थितीत पराभूनत करावे लागेल. तसेच, श्रीलंकेलाही मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल, जेणेकरून नंतर जेव्हा नेट रन रेटचा खेळ येईल, तेव्हा टीम इंडियाचे नेट रन रेट ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला असेल.