भारताचा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दणका दिला आहे. BCCI च्या आचारसंहितेत असलेल्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी दिनेश कार्तिकला नोटीस पाठवण्यात आली आहे. कॅरेबीयन प्रिमीयर लीग स्पर्धेत कार्तिक त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघासोबत दिसला. सेंट किट्स अँड निव्ह्स पॅट्रीऑट्स संघाविरूद्ध तो त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये तो दिसून आला असे वृत्त एका संकेतस्थळाने प्रसिद्ध केले होते. त्यामुळे त्याला नोटीस पाठवण्यात आली आहे.

दिनेश कार्तिक हा BCCI शी वार्षिक कालावधीसाठी करारबद्ध आहे. या कराराअंतर्गत मंडळाच्या परवानगीशिवाय कोणत्याही परदेशी क्रिकेट स्पर्धांमध्ये किंवा लीगमध्ये सहभागी होणे हा नियमांचा भंग ठरतो. त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाचे मालकी हक्कदेखील IPL च्या कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या मालकाकडेच आहेत. पण CPL मधील त्या सामन्यात कार्तिक त्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाच्या डगआऊटमध्ये बसलेला आढळला. त्यामुळे त्याला नोटीस पाठवण्यात आली असून उत्तर देण्यासाठी आठवड्याभराचा कालावधी देण्यात आला आहे.

विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये झालेल्या उपांत्य सामन्यात कार्तिकने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. पण त्या सामन्यात भारताला पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर विंडिज दौऱ्यावर मात्र त्याला संधी देण्यात आली नाही.

Story img Loader