The first step to solve any problem is to acknowledge that there is a problem…इंग्रजी भाषेतली ही म्हण भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी तंतोतंत लागू पडत आहे. त्याचं झालं असं की जगभरात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ब्रेक लागला. आयसीसीने नवीन नियम व अटींसह पुन्हा एकदा क्रिकेटला मान्यता दिली. परंतू आयपीएलच्या तेराव्या हंगामात खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंसाठी बीसीसीआयने सर्व दौरे रद्द करत थेट वर्षाअखेरीस प्रस्तावित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याचं ठरवलं….आणि ज्याची अपेक्षा होती तेच झालं. तब्बल ८ ते ९ महिन्यांच्या कालावधीनंतर पहिली मालिका खेळणाऱ्या भारतीय संघाच्या पदरी पराभव पडला. ३ वन-डे सामन्यांपैकी पहिल्या दोन वन-डे सामन्यांमध्ये कांगारुंनी भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. भरीस भर म्हणून ठराविक अपवाद वगळता भारतीय फलंदाजही अपयशी ठरत आहेत. टीम इंडियाकडे पाहिल्यानंतर या संघाचं काहीतरी तंत्र बिघडलंय असं वारंवार वाटत राहतं…दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भारतीय कर्णधाराला अजून तसं वाटत नाहीये.

आता या लेखात मी जाणून-बुजून रोहित, त्याला झालेली दुखापत आणि संघावर त्याचा होणारा परिणाम यावर फारसं बोलणार नाहीये. रोहित भारतीय संघात नाहीये हे सत्य स्विकारुन दोन सामन्यांमधील भारतीय संघाच्या कामगिरीचं विश्लेषण व्हायला हवं. दोन्ही सामन्यांतली भारतीय संघाची फलंदाजी पाहिली तर रोहित शर्माची उणीव संघाला भासतेय यात काही वादच नाही. परंतू आपल्यापाशी असलेले पर्याय विराट कोहली नीट हाताळतोय का असा प्रश्न पडायला लागला आहे.

फॉर्मात असलेल्या राहुलऐवजी मयांकला सलामीला संधी –

लोकेश राहुल आणि मयांक अग्रवाल या दोन्ही फलंदाजांनी आयपीएल गाजवलं. परंतू आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट यामध्ये फरक असतो हे सांगायला आपल्यापैकी कोणाची गरज लागू नये. दोन खेळाडूंच्या तुलनेत लोकेश राहुलकडे वन-डे आणि टी-२० चा जास्त अनुभव आहे. आयपीएलचा निकष लावायला गेल्यास तेराव्या हंगामात राहुलनेच सर्वाधिक धावा काढत ऑरेंज कॅपचा मान पटकावला होता. अशा परिस्थितीत कोणता हिशोब लावत विराटने सलामीसाठी मयांकची निवड केली हे गणित न समजण्यासारखं आहे. याआधी न्यूझीलंड दौऱ्यात मयांकला संधी देण्यात आली होती, पण तिकडे तो आपली छाप पाडू शकला नाही. आयपीएलच्या कामगिरीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याला स्थान मिळालं. परंतू दोन्ही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर तो झटपट माघारी परतला. पहिल्या सामन्यातील चित्र पाहता विराटने एकतर संघात बदल करुन राहुलला सलामीला पाठवत मधल्या फळीत मनिष पांडेला संधी द्यायला हवी होती.

बरं एका सामन्याच्या निकषावर मयांकला संघाबाहेर काढणं विराटला योग्य वाटत नसेल तर चौथ्या क्रमांकावर त्याचा विचार करता आला असता. परंतू विराट आणि टीम इंडिया आहे त्या रणतिनीवर ठाम राहिली आणि त्याचा फटका भारतीय संघाला बसला. नवीन खेळाडूंना संधी देण्यात काहीही वावगं नाही, पण योग्य खेळ होत नसेल तर पर्यायांचा वापर करण्यास सक्त मनाई आहे असा नियम अजुनतरी लागू झालेला नाही.

सहावा गोलंदाज कोण?? भिजत घोंगडं कायम…

गेल्या काही सामन्यांपासून हार्दिक पांड्या आपल्या पाठीच्या दुखापतीमुळे गोलंदाजी करत नाहीये. संघात त्याचा वापर हा फलंदाज म्हणून होतोय. मात्र ५ गोलंदाज घेऊन खेळताना हार्दिक पांड्याचं गोलंदाजी न करणं संघाला चांगलंच भोवतंय. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी वन-डे सामन्यात हार्दिकने गोलंदाजी केली खरी…पण त्याचा फारसा परिणाम झाला नाही. हार्दिक पांड्या प्रसारमाध्यमांशी बोलत असताना, मी संघात फलंदाज म्हणून खेळणार असल्याचं सांगतोय. पण याची संघाला काय किंमत मोजावी लागणार आहे?? बरं हार्दिक फलंदाज म्हणून खेळणार असेल तर भारताचे आताचे गोलंदाजीचे पर्याय हे तगडे आहेत का?? तर याचं उत्तर नाहीचं येतंय. जसप्रीत बुमराह हे भारताचं ब्रम्हास्त्र आहे….परंतू गेले काही सामने पाहता या ब्रम्हास्त्राची धार बोथट झाली आहे. मोहम्मद शमीकडे अनुभव आहे…पण कामगिरीतलं सातत्य हा नेहमी त्याच्याबाबतीत चर्चेचा मुद्दा ठरतो.

नवदीप सैनीवर विराट कोहलीचा प्रचंड विश्वास असला तरीही पहिल्या दोन वन-डे सामन्यांतली त्याची कामगिरी पाहता सैनीला आणखी थोडी वाट पाहण्याची सक्त गरज आहे असं दिसून येतंय. अशा परिस्थितीत हार्दिक जर गोलंदाजी करणार नसेल आणि इतर ५ गोलंदाजांपैकी दोन गोलंदाजांचा दिवस खराब असेल तर गोलंदाजी करणार कोण?? याचं उत्तर शोधण्याची तसदी टीम इंडियाची मॅनेजमेंट घेतेय असं वाटत नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेला पराभव हा २०२० वर्षातला भारतीय संघाचा सलग पाचवा पराभव होता. २०१९ मध्येही एका सामन्यानंतर विराट कोहलीने वन-डे सामन्यातले निकाल सध्या महत्वाचे नसल्याचं वक्तव्य केलं होतं. वन-डे विश्वचषक २०२३ साली होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर विराटने हे वक्तव्य केलं होतं. वन-डे क्रिकेटकडे पाहण्याचा विराटचा हा दृष्टीकोन अत्यंत चुकीचा आहे. दुर्दैवाने वन-डे सामने खेळण्यासाठी मैदानात उतरलेल्या टीम इंडियामध्ये विजयाची भूकच दिसत नाही. भविष्याचा विचार करुन संघ उभारणीचा विचार न करता विराटसेना सध्या…नंतर पाहू असा आळशी दृष्टीकोन वापरत आहे. बरं या समस्या आणि मुद्दे इथेच थांबत नाही. कुलदीप यादवला न मिळणारी संधी, गोलंदाजीत आवश्यक वेळेला न होणारे बदल, यष्टीरक्षणाचा प्रश्न अशा अनेक समस्या टीम इंडियासमोर आ वासून उभ्या आहेत. दुर्दैवाने विराट आणि टीम इंडियाची मॅनेजमेंट या प्रश्नांकडे गंभीरपणे पाहताना दिसत नाही.

२०१९ साली भारतीय संघाला याच अप्रोचचा फटका बसला होता. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येणार?? या प्रश्नाचा उहापोह स्पर्धेआधी किमान दीड ते दोन वर्ष सुरु होता. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे स्पर्धा उपांत्य फेरीत येऊन पोहचली तरीही तो उहापोह सुरुच होता. शेवटपर्यंत या प्रश्नाचं उत्तर न शोधल्याचा फटका टीम इंडियाला २०१९ साली बसला. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही आगामी विश्वचषकासाठी टीम इंडियाकडे किमान ६-७ पर्याय असणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. या संघाच्या जोरावर टीम इंडिया विश्वचषक जिंकू शकणार नाही असंही वॉन म्हणाला. संघनिवडीचं आपलं तंत्र चुकतंय हे मान्य करण्याचं धारिष्ट्य विराटने दाखवायला हवं. बघू रे नंतर हा दृष्टीकोन २०१९ साली महागात पडला होता आणि तो २०२३ सालीही पडू शकतो. त्यामुळे संघात समस्या तर नक्कीच आहेत, फक्त विराट त्या मान्य करायला हव्यात.

आपल्या प्रतिक्रिया prathmesh.dixit@indianexpress.com या इ-मेलवर पाठवा.

Story img Loader