टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक सध्या खूप चर्चेत आहे. आयसीसी टी२० विश्वचषक २०२२ च्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा १० विकेट्सनी पराभव झाला. १६९ धावांचे लक्ष्य देऊनही टीम इंडियाच्या गोलंदाजांना इंग्लंडची एकही विकेट काढता आली नाही. भारताच्या उपांत्य फेरीतील मानहानीकारक पराभवानंतर उमरान मलिक चर्चेत आहे. उमरान इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळतो. याशिवाय तो १८ नोव्हेंबरपासून न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा भाग आहे. भारताला न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उमरान मलिकने टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे आणि त्याने भारतासाठी एकूण तीन सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १२.४४च्या इकॉनॉमी रेटने धावा देत दोन विकेट्स घेतल्या. त्याचा वेगच हा सर्वात उल्लेखनीय आहे. तो लागोपाठ १५०किमी वेगाने गोलंदाजी करतो. माजी क्रिकेटपटूंनी त्याचा वेग पाहून म्हटले, ‘तो जसजसा खेळत जाईल तसतशी त्याची गोलंदाजी अधिक उत्तम होत जाईल.’

उमरानने नुकतेच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यावरून तो न्यूझीलंड दौऱ्यासाठी कसून सराव करत असल्याचे दिसून येत आहे. तसेच त्याने आयपीएलमध्ये १७ सामने खेळले असून त्यामध्ये ८.८३च्या इकॉनॉमी रेटने २४ विकेट्स घेतल्या आहेत. उजव्या हाताच्या या गोलंदाजाचे आंतरराष्ट्रीय पदार्पण हवे तसे झाले नाही. त्याने आर्यलंडच्या दौऱ्यात एक षटक टाकताना १४ धावा दिल्या होत्या. तसेच त्याला त्यानंतर झालेल्या इंग्लंड दौऱ्याच्या टी२० मालिकेतही घेतले होते. त्याने ४ षटके टाकताना ५६ धावा देत सलामीवीर जेसन रॉय याची विकेट घेतली होती.

हेही वाचा :  इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर विराट कोहली परतला मायदेशी, पाहा video 

१८ नोव्हेंबरपासून न्यूझीलंड मालिका सुरू होत आहे. या मालिकेत तीन टी२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, आता मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक आणि माजी अनुभवी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण हे टीम इंडियाच्या कार्यवाहक मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारतील.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Team india fast bowler umran malik ready for new zealand tour fitness video viral avw
Show comments