ऑस्ट्रेलिया आणि भारत या क्रिकेटमधील दोन महासत्ता आता दक्ष आहेत, कारण विश्वचषक जिंकण्याचे लक्ष्य त्यांनी जोपासले आहे. मागील दोन विश्वचषकांचे विजेते, जागतिक एकदिवसीय क्रमवारीतील अव्वल दोन स्थानांवर विराजमान असलेले आणि क्रिकेटच्या अर्थकारणावर वर्चस्व असणारी ही दोन राष्ट्रे रविवारी तिरंगी एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेत एकमेकांसमोर उभी ठाकणार आहेत. त्यामुळे क्रिकेटरसिकांसाठी ही आगळी मेजवानी ठरणार आहे.
२०११ मध्ये एकदिवसीय क्रिकेटच्या शिखरावर आरूढ होताना भारताने विश्वचषकाला गवसणी घातली होती. आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली हा चषक पुन्हा जिंकण्याचा निर्धार भारताने केला आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार मायकेल क्लार्कने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्यामुळे जॉर्ज बेलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ मायदेशात होणाऱ्या विश्वचषकासाठी कसून सराव करीत आहे.
तिरंगी एकदिवसीय स्पध्रेवर नुकत्याच झालेल्या बोर्डर-गावस्कर चषक कसोटी मालिकेचे सावट आहे. त्या मालिकेत स्टीव्हन स्मिथ आणि विराट कोहली या दोघांनीही आपण कसोटी फलंदाज आणि चांगले कर्णधार असल्याचे सिद्ध केले. अनुकूल खेळपट्टय़ांवर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी नेहमीच बहरेल, याची खात्री देता येणार नाही, तर वेगवान गोलंदाज मागील हंगामाचीच पुनरावृत्ती करतील, अशी आशा आहे. ऑस्ट्रेलियाच्या मैदानांवर भारतीय गोलंदाजांना सातत्य राखता आलेले नाही. त्यामुळे एकदिवसीय स्पध्रेतील या दोन बलाढय़ संघांची लढत चुरशीची होईल, अशी अपेक्षा आहे.
स्फोटक स्टार्क
मिचेल स्टार्क एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्या दोन षटकांतच जगातील सर्वात धोकादायक गोलंदाज आपण आहोत, हे सिद्ध करतो. वेग, स्विंग यांच्यासह नव्या चेंडूचा खुबीने वापर करीत स्टार्कने शुक्रवारी इंग्लिश फलंदाजांवर अंकुश ठेवला होता. कसोटी क्रिकेटमध्ये अद्याप सातत्य सिद्ध करता आले नसले तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्टार्कने आपली योग्यता दाखवून दिली आहे.
रोहितकडून आशा
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी मालिकेत जरी रोहित शर्मा धावांसाठी झगडताना आढळला, तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो धावांचा पाऊस पाडेल, अशी अपेक्षा आहे. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत रोहितने विश्वविक्रमी खेळी साकारली होती; परंतु तो पराक्रम भारतात साकारला होता, आता धावा काढायच्या आहेत त्या ऑसी मैदानांवर. सिडनीच्या अखेरच्या कसोटीत त्याने आशादायी फलंदाजी केली होती.
संधूला संधी?
डेव्हिड वॉर्नरच्या दिमाखदार शतकानेच इंग्लंडविरुद्ध विजयाचा अध्याय लिहिला होता. मायकेल क्लार्क आणि मिचेल मार्श हे संघात नसल्यामुळे वॉर्नरने दुखापतीची पर्वा न करता ती खेळी साकारली होती. भारताविरुद्धच्या सामन्यात झेव्हियर डोहर्टीच्या जागी गुरिंदर संधूचा समावेश केला जाऊ शकतो.
धवनसोबत सलामीला कोण?
शिखर धवनसोबत सलामीला रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांच्यासोबत कोणाला पाठवायचे, हा भारतासमोर प्रश्न आहे. इशांत शर्मा आणि रवींद्र जडेजा हे दोघेही दुखापतीतून सावरले असले तरी रविवारी खेळणार नाहीत. त्यामुळे पाच विशेष गोलंदाजांचा समावेश संघात करावा लागणार आहे.
खेळपट्टी आणि वातावरण
मेलबर्नची कसोटी खेळपट्टी धिमी आणि न बदलणारी होती; परंतु एकदिवसीय सामन्यासाठी तयार केलेल्या खेळपट्टीवर वेग आणि उसळी यांची साथ मिळू शकते. याशिवाय रविवारी मेलबर्नमधील वातावरण सामन्यासाठी अतिशय छान असेल, असे हवामान खात्याने सांगितले आहे.
संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार व यष्टिरक्षक), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, विराट कोहली, अंबाती रायुडू, सुरेश रैना, स्टुअर्ट बिन्नी, अक्षर पटेल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव, धवल कुलकर्णी, मोहित शर्मा.
ऑस्ट्रेलिया : जॉर्ज बेली (कर्णधार), पॅट कमिन्स, झेव्हियर डोहर्टी, जेम्स फॉल्कनर, आरोन फिन्च, ब्रॅड हॅडिन (यष्टिरक्षक), जोश हॅझलवूड, मिचेल जॉन्सन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर, शेन वॉटसन, केन रिचर्ड्सन, गुरिंदर संधू.
सामन्याची वेळ : सकाळी ८ वा. ५० मि.पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स-१ आणि ३ वर.
मेलबर्न खेळपट्टीच्या आधारे प्रतिस्पर्धी संघ फिरकीवर विश्वास ठेवण्याबाबत निर्णय घेईल; परंतु आम्हाला याची चिंता बाळगायची काहीच आवश्यकता नाही. संघातील सर्वच जण चांगले फॉर्मात आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटसाठी हे अतिशय आशादायी वातावरण आहे.
जेम्स फॉल्कनर, ऑस्ट्रेलियाचा खेळाडू
विश्वचषकासाठी हीच खेळपट्टी उपलब्ध असेल, त्यामुळे या वातावरणाचा आनंद लुटून खेळणे महत्त्वाचे ठरेल; परंतु वर्तमानाचा विचार केल्यास जागतिक क्रिकेटमधील दोन अव्वल संघांशी या स्पध्रेत सामना करायचा आहे, हे ध्यानात ठेवावे लागणार आहे.
महेंद्रसिंग धोनी, भारताचा कर्णधार