ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी संदीप पाटील यांच्या निवड समितीने कोणताही मोठा धक्का न देता अपेक्षित १५ सदस्यीय संघनिवड केली. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या दोन्ही डावखुऱ्या फिरकीपटूंना संधी दिली आहे. त्याचबरोबर अंबाती रायुडूवर मधल्या फळीतील फलंदाजाबरोबर अतिरिक्त यष्टिरक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीनेही विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवले आहे. विश्वचषकाबरोबरच या वेळी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठीही संघाची निवड करण्यात आली आहे.
निवड समितीची बैठक होण्यापूर्वी युवराज सिंगचे नाव चांगलेच चर्चेत होते. युवराज हा गेल्या विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता; पण सध्याचा त्याचा फॉर्म आणि फिटनेस पाहता त्याला ३० जणांच्या यादीमध्येही स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे निवड समितीने त्याचा विचार निवड करताना केला नाही. सलामीवीर मुरली विजयचे नावही चांगलेच चर्चेत होते; पण विजयला सध्याच्या एकदिवसीय संघातही स्थान दिले नसल्याने विश्वचषकासाठी त्याला संधी देण्यात आली नाही. रॉबिन उथप्पा हा सलामीवीर आणि यष्टिरक्षकाची भूमिका पार पाडू शकत असला तरी तोदेखील एकदिवसीय संघात नसल्याने त्यालाही विश्वचषकाच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही.
रोहित शर्मा आणि शिखर धवन हे दोन सलामीवीर असले तरी अजिंक्य रहाणे हा मधल्या फळीबरोबरच सलामीवीराची भूमिका पार पाडू शकतो. त्याचबरोबर मधल्या फळीत विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायुडू यांचा समावेश जवळपास निश्चितच होता.
वेगवान गोलंदाजांच्या यादीमध्ये इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव यांचा समावेश आहे. मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारलाही संघात स्थान देण्यात आले आहे. वरुण आरोनला मात्र विश्वचषकासाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही. फिरकी गोलंदाजांमध्ये आर. अश्विनसह जडेजा आणि पटेल यांचा समावेश करण्यात आलेला आहे. भारतीय संघ निवडताना अधिकाधिक अष्टपैलू खेळाडूंवर भर दिल्याचे जाणवत आहे. विश्वचषकासाठी अपेक्षित संघ निवडल्यानंतर यापैकी कोणत्या ११ खेळाडूंना संघात स्थान द्यायचे यासाठी कर्णधार, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापनाची कसोटी लागणार आहे.
‘‘दुखापतीनंतर जडेजाचे पुनर्वसन सुरू आहे. याबाबत संघाच्या फिजिओशी आम्ही सखोल चर्चा केली असून तो येत्या दहा दिवसांमध्ये सराव सुरू करेल,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय पटेल यांनी सांगितले.
संदीप पाटलांचे मौन
मुंबई : दर चार वर्षांनी होणाऱ्या क्रिकेटच्या महासोहळ्यासाठी भारतीय संघाची निवड केल्यानंतर निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील समितीची भूमिका विशद करतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनी मौन पाळणे पसंत केले. विश्वचषक स्पर्धा आणि ऑस्ट्रेलियात होणारी तिरंगी एकदिवसीय मालिका याविषयी कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास पाटील यांनी नकार दिला. इशांत शर्मा आणि रवींद्र जडेजा यांच्या दुखापतींबाबत बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी माहिती दिली.
विश्वचषक २०१५: संपूर्ण वेळापत्रक
विशेष म्हणजे, रणजी स्पर्धेतील शानदार कामगिरी, अष्टपैलू रवींद्र जडेजाला झालेली दुखापत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव या मुद्दय़ांच्या बळावर युवराजचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले होते. परंतु, युवीचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे युवराजच्या निवडीसंदर्भात सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. तर, जडेजाच्या दुखापती संदर्भात डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार तो दुखापतीतून सावरत असून जडेजा जवळपास फीट आहे. शिवाय पूर्णपणे फिट होण्यासाठी जडेजाजवळ एक महिन्याचा अवधी आहे. या पार्श्वभूमीवर निवड समितीने रविंद्र जडेजाचा अंतिम पंधरा जणांमध्ये समावेश केला आहे. विशेष म्हणजे, अष्टपैलूंच्याबाबतीत स्टुअर्ट बिन्नीचा विचार यावेळी निवड समितीने केला असून त्याचे तिकीट पक्के केले आहे. तसेच अंबाती रायुडूवर देखील निवड समितीने विश्वास दर्शवला आहे. सुरेश रैनाच्या सामावेशानेही टीम इंडियाची मधळी फळी भक्कम झाली आहे. गेल्या वर्षभरात अष्टपैलू कामगिरी करत छाप उमटवणाऱ्या अक्षर पटेलला अंतिम पंधरा खेळाडूत स्थान मिळाले आहे. प्रमुख फिरकीपटू म्हणून रवीचंद्रन अश्विनच्या नावाला पसंती दिली आहे.
फोटो गॅलरी- विश्वचषकासाठीचा भारतीय संघ
गोलंदाजांना पोषक असणाऱया खेळपट्ट्यांवर विश्वचषक स्पर्धा होत असल्यामुळे सर्वोत्तम गोलंदाजांचा भरणा असण्यालाही महत्त्व देण्यात आले आहे. भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव यांच्यावर भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीची मदार असणार आहे.
विश्वचषक स्पर्धेसाठीचा अंतिम पंधरा खेळाडूंचा भारतीय संघ-
महेंद्रसिंग धोनी(कर्णधार), विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, आर.अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अंबाती रायुडू, इशांत शर्मा, उमेश यादव, स्टुअर्ट बिन्नी.
फक्त चारचौघे विश्वविजेते
मागील विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघातील कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सुरेश रैना आणि आर. अश्विन या चार खेळाडूंनी संघात स्थान मिळवले आहे, तर ११ खेळाडू यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठीच्या संघात नाहीत. यापैकी सचिन तेंडुलकरने निवृत्ती पत्करलेली आहे, तर एस. श्रीशांतवर स्पॉट-फिक्सिंग प्रकरणी बंदी घातलेली आहे. परंतु बाकीचे नऊ खेळाडू खराब कामगिरीमुळे संघात स्थान मिळवू शकलेले नाहीत. मागील विश्वचषक स्पध्रेत सर्वोत्तम खेळाडू ठरलेला युवराज सिंगसुद्धा संघात स्थान मिळवू शकला नाही.
विश्वचषकासाठीच्या संघासोबतच ऑस्ट्रेलिया-भारत-इंग्लंड दरम्यान १६ जानेवारी पासून होणाऱया तिरंगी मालिकेसाठीही यावेळी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. या मालिकेत धोनी नेतृत्त्वाखाली संघ खेळणार असून विराट कोहली उपकर्णधार असणार आहे. या मालिकेसाठी धवल कुलकर्णी आणि मोहित शर्मा यांना संधी देण्यात आली आहे.
तिरंगी मालिकेसाठीचा भारतीय संघ-
महेंद्रसिंग धोनी(कर्णधार), विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, रविंद्र जडेजा, आर.अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अंबाती रायुडू, इशांत शर्मा, उमेश यादव, स्टुअर्ट बिन्नी, मोहित शर्मा आणि धवल कुलकर्णी.