Arshdeep Singh on World Cup: २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघात एकही डावखुरा वेगवान गोलंदाज नाही आणि उजव्या हाताचा फिरकी गोलंदाजही नाही. अशा परिस्थितीत भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी टीम इंडियावर प्रश्न उपस्थित केले आहेत. संघात एकाही डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाची निवड न केल्याने त्याने निवडकर्त्यांवर निशाणा साधला आहे.
भरत अरुण यांनी विश्वचषक स्पर्धेसाठी १५ जणांच्या प्राथमिक संघातून ‘डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज’ अर्शदीप सिंगला वगळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अर्शदीपने गेल्या वर्षी भारतीय संघात पदार्पण केले होते, मात्र तेव्हापासून तो संघात आतबाहेर करत आहे. अलीकडेच, तो वेस्ट इंडिज आणि आयर्लंडच्या मर्यादित षटकांच्या दौऱ्यासाठी संघाचा भाग होता. आधी त्याला आशिया चषक आणि त्यानंतर विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे. अरुण यांनी अर्शदीपचे कौतुक केले आणि संघातून वगळल्याबद्दल आश्चर्यही व्यक्त केले.
भरत अरुण यांनी एका यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “आम्ही आमच्या काळात डावखुरा वेगवान गोलंदाज आणण्याचा प्रयत्न केला. आम्हाला संघात नेहमीच डावखुरा वेगवान गोलंदाज हवा होता. अर्शदीपकडून खूप अपेक्षा होत्या, तशी त्याने कामगिरी देखील केली. तो आता संघात का नाही? हे मला माहीत नाही. जर तो संघात राहिला असता तर तो खूप प्रभावी ठरला असता. डेथ ओव्हर्समध्ये तो यॉर्कर टाकण्यास सक्षम आहे तसेच, नव्या चेंडूने चांगली स्विंग गोलंदाजी देखील करू शकतो.”
पुढे अरुण म्हणाले, “अर्शदीप एक गुणी वेगवान गोलंदाज आहे. जर तो वर्ल्डकपमध्ये राहिला असता तर खूप फरक पडला असता. मला अजिबात आश्चर्य वाटत नाही की, जरी तो कुठेही असला तरी अप्रतिमच गोलंदाजी करेन. या गोलंदाजांना कोविड काळात भारतीय संघात घेतले असते तर तो लवकर सेट झाला असता. याबाबत रवी शास्त्रीनेच ही प्रक्रिया थांबवली.”
अर्शदीपने भारतासाठी आतापर्यंत तीन वन डे आणि ३३ टी२० सामने खेळले आहेत. त्याने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये ५० विकेट्स घेतल्या आहेत. सात सर्वोत्तम फलंदाजांव्यतिरिक्त, निवडकर्त्यांनी चार अष्टपैलू आणि चार वेगवान गोलंदाजांची विश्वचषक संघात निवड केली आहे. भारताने नेपाळला त्यांच्या दुसऱ्या गट सामन्यात दहा गडी राखून पराभूत करून आशिया चषक २०२३च्या सुपर-४ टप्प्यासाठी पात्र ठरले. मेन इन ब्लू त्यांचा पहिला सुपर-४ सामना रविवार, १० सप्टेंबर रोजी आर.जे. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी सामना होईल. उभय संघांमधील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.