WTC 2023 Final India vs Australia : भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कर्णधार रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराच्या फलंदाजीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल लंडनच्या ओव्हल मैदानात सुरु आहे. या सामन्यातील दुसऱ्या इनिंगमध्ये रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा चुकीचा शॉट खेळून बाद झाला. यावर शास्त्री यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. या दोन्ही दिग्गज खेळाडूंच्या शॉट सिलेक्शनवर शास्त्री यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
रोहित-चेतेश्वरच्या फलंदाजीबाबत बोलताना रवी शास्त्री म्हणाले, या सामन्यात खेळपट्टीची अनुकूलता ज्या प्रकारे दिसत आहे, ते पाहून मला खूप आश्चर्य वाटलं आहे. ज्या प्रकारे रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजाराने शॉट खेळला ते पाहून दोघेही स्वत:बद्दल खूप नाराज असतील. हे दोन्ही खेळाडू खूप चांगली फलंदाजी करत होते. परंतु, त्यानंतर खराब शॉट खेळून बाद झाले.
दुसऱ्या इनिंगमध्ये रोहित आणि चेतेश्वरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. भारताला चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही या दोन्ही फलंदाजांनी त्याचा फायदा उचलला नाही आणि चुकीचा शॉट खेळून बाद झाले. रोहित शर्मा स्विफ शॉट खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. तर पुजारा उसळी घेतलेल्या चेंडूवर अप्पर कट मारताना झेलबाद झाला. रोहित शर्माने ४३ आणि पुजाराने २७ धावा केल्या.
भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरु असलेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनलचा सामना रोमांचक मोडवर आला आहे. ऑस्ट्रेलियाने त्यांच्या २७० धावांवर दुसरी इनिंग घोषीत केली आणि भारतापुढं ४४४ धावांचं लक्ष्य ठेवलं. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना भारताने चौथा दिवस संपेपर्यंत ३ विकेट्स गमावत १६४ धावा केल्या होत्या. भारताला हा सामना जिंकण्यासाठी आजच्या शेवटच्या दिवशी आणखी २८० धावा करण्याची आवश्यकता आहे. तर ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी भारताचे ७ विकेट्स घ्यावे लागतील.