India vs Australia, WTC 2023 Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३च्या अंतिम सामन्यात, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु खेळाच्या पहिल्या दिवशी तरी त्याचा निर्णय टीम इंडियाच्या हिताचा नव्हता. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाला ७६ धावांवर ३ विकेट्स काढण्यात यश मिळाले, मात्र त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी भारतीय गोलंदाजांवर जोरदार आक्रमण करत टीम इंडियाला सामन्यात मागे टाकले आहे. यावर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू मॅथ्यू हेडनने मोठे विधान केले आहे.
खेळाच्या पहिल्याच दिवशी ट्रॅव्हिस हेडने नाबाद १४६ धावा केल्या होत्या, तर स्मिथने नाबाद ९५ धावा केल्या आणि खेळ संपेपर्यंत कांगारूंनी पहिल्या दिवशी भारताविरुद्ध ३ बाद ३२७ अशी मोठी धावसंख्या उभारली होती. या दोन्ही फलंदाजांनी खेळाच्या पहिल्या दिवशी चौथ्या विकेटसाठी २५१ धावांची नाबाद भागीदारी केली. म्हणजेच यावेळी या सामन्यात ऑसी संघाचा वरचष्मा दिसला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा ट्रॅविस हेड जगातील पहिला फलंदाज ठरला.
आता पहिल्याच दिवशी भारतीय संघ या सामन्यात ज्या टप्प्यावर आला होता, त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज मॅथ्यू हेडनने कर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघावर निशाणा साधला. मॅथ्यू हेडनने भारतीय संघाच्या या स्थितीत येण्यासाठी टीम इंडियाने घेतलेले दोन निर्णय पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. “आपल्यासाठी महत्त्वाचा खेळाडू ठरू शकणाऱ्या आर. अश्विनला संघात न घेणे हा धक्कादायक निर्णय असल्याचे तो म्हणाला. भारतासाठी, या कसोटी चॅम्पियनशिप सायकलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूला संघाबाहेर राहणे भारताच्या हिताचे नव्हते. यामुळे टीम इंडियाने विजयाची संधी गमावली आहे असे मला वाटते.”
याशिवाय मॅथ्यू हेडन पुढे म्हणाला की, “हा सामना जसजसा पुढे जाईल तसतशी खेळपट्टी वळण अधिक घेईल आणि फिरकीपटूंना येथे संधी असेल, यात मला कोणतीही शंका नाही. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया संघाकडे अनेक डावखुरे फलंदाज असताना आर. अश्विन त्यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकला असता.” त्याचवेळी हेडनने कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणे ही मोठी धोरणात्मक चूक असल्याचे म्हटले आणि तेच भारतासाठी घातक ठरू शकते.” यावर रिकी पाँटिंगने सूचक विधान केले आहे. तो म्हणाला की, “टीम इंडियाने चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याच्या निर्णयामुळे मी आश्चर्यचकित झालो आहे.”
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या
ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या होत्या. ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक १६३ धावांची खेळी केली. त्याचवेळी स्टीव्ह स्मिथने १२१ धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी २८५ धावांची भागीदारी केली. अॅलेक्स कॅरीने ४८ आणि डेव्हिड वॉर्नरने ४३ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन गडी बाद केले. रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली. मिचेल स्टार्क धावबाद झाला. या मोठ्या धावसंख्येशी बरोबरी साधण्यासाठी भारताला तिसऱ्या दिवसअखेरपर्यंत फलंदाजी करावी लागणार आहे. मात्र टीम इंडियाच्या ५५ धावांवर तीन विकेट्स पडल्या आहेत.