Women’s T20 World Cup 2023 Semifinal: महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. पण या सामन्यापूर्वीच टीम इंडियासाठी एक वाईट बातमी आली आहे. संघाची स्टार अष्टपैलू पूजा वस्त्राकर आजारपणामुळे सेमीफायनल खेळू शकणार नाही. चांगली गोष्ट म्हणजे भारतीय संघ व्यवस्थापनाने बदली खेळाडूची मागणी केली होती, ज्याला आयसीसीने सहमती दिली आहे.
पूजा वस्त्राकरच्या जागी दुसऱ्या एका खेळाडूचाही संघात समावेश करण्यात आला आहे. २४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांसह एकूण ४७ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या स्नेह राणाचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळे पूजा वस्त्राकर दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या टी-२० वर्ल्ड कप २०२३ मधून बाहेर पडली आहे. तिच्या जागी स्नेह राणा भारताच्या अंतिम पंधराव्या संघाचा भाग असेल.
भारतीय संघाला आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२३ उपांत्य फेरीत आज ऑस्ट्रेलियाचा सामना करायचा आहे. ऑस्ट्रेलिया संघमजबूत असून तो गतविजेता आहे. पूजा वस्त्राकर लयीत दिसत होती, पण आता ती स्पर्धेतून बाहेर आहे. आयसीसीच्या इव्हेंट टेक्निकल कमिटीने पूजा वस्त्राकरच्या बदलीला मान्यता दिली आहे. अशा स्थितीत स्नेह राणा उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळण्यास पात्र ठरली आहे.
हेही वाचा – INDW vs AUSW Semi-Final सामना पावसाने वाया गेला, तर अंतिम फेरीत कोणाला मिळणार प्रवेश? जाणून घ्या
कर्णधार देखील आजारी आहे –
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरही आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, हरमनप्रीत कौर आणि पूजा वस्त्राकर यांना बुधवारी संध्याकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. वस्त्राकर बाहेर आहे, पण कर्णधार हरमनप्रीत कौरबाबत निर्णय सामन्यापूर्वी घेतला जाईल. जर ती पूर्णपणे तंदुरुस्त नसेल तर स्मृती मंधाना कर्णधारपद भूषवताना दिसणार असून भारतीय संघात बदल पाहायला मिळतील.
टीम इंडियाची उत्कृष्ट कामगिरी –
महिला टी-२० विश्वचषकात टीम इंडियाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. संघाने ४ पैकी ३ साखळी सामने जिंकले आहेत. भारताचा एकमेव पराभव इंग्लंडच्या हातून झाला. मात्र आयर्लंडविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाने उपांत्य फेरीत प्रवेश केला.