Rahul Dravid and his support staff were contracted till the World Cup 2023: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडच्या भविष्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा केलेली नाही. १५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील प्रतिष्ठित वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध भारत उपांत्य फेरीत हरला असता, तर द्रविड आणि त्याच्या सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ तिथेच संपला असता. मात्र, भारताने केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील संघावर ७० धावांनी विजय मिळवून बाद फेरीत किवीविरुद्ध पहिला विजय मिळवला.
त्याचबरोबर चौथ्यांदा अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने निर्धारित ५० षटकांत चार गडी गमावून ३९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात ३९८ धावांचा पाठलाग करायला उतरलेला न्यूझीलंडचा संघ ४८.५ षटकांत ३२७ धावांवर गारद झाला. त्यामुळे भारतीय संघाने ७० धावांनी सामना जिंकला. आता १९ नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलमध्ये भारताचा सामना दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियाशी होईल.
राहुल द्रविडचा करार २०२३ च्या वर्ल्ड कपपर्यंत –
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, द्रविड आणि त्याच्या सपोर्ट स्टाफमध्ये या वर्ल्ड कपपर्यंत करार होता आणि त्यांच्या भविष्याबाबत बीसीसीआयमध्ये मतभिन्नता होती. सुरुवातीला द्रविडच्या कोचिंग स्टाईलबद्दल शंका व्यक्त केल्या जात होत्या, मात्र भारतीय संघाच्या अलीकडच्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली असून ती पाहता आता द्रविडचा करार वाढवला जाऊ शकतो, असे मानले जात आहे. मात्र, आता खुद्द राहुल द्रविड भविष्यात कोचिंग करण्याची इच्छा व्यक्त करतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
या माजी भारतीय क्रिकेटपटूने सुरुवातीच्या टप्प्यात चांगला प्रभाव टाकून २०२१ मध्ये मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. मात्र, संघाच्या कामगिरीची पर्वा न करता विश्वचषकानंतर तो स्वेच्छेने पायउतार होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात होती. भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड प्रशिक्षकपदी कायम राहतो की नाही. याबाबत अजून अस्पष्टता आहे. मात्र फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड, गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांबरे आणि त्यांचे सदस्य क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांच्यासह सपोर्ट स्टाफचा करार वाढवला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.