Rahul Dravid on Team India: भारतीय क्रिकेट संघाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. वास्तविक, बीसीसीआयने बुधवारी राहुल द्रविडचा कार्यकाळ वाढवण्याची घोषणा केली होती. गुरुवारी द्रविडने त्याबाबत मोठे विधान केले आहे. पीटीआयने एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या कार्यकाळ वाढवण्याच्या विषयावर बोलला आहे. द्रविड म्हणाला की, “मी अद्याप कोणत्याही करारावर स्वाक्षरी केलेली नाही. माझ्या कार्यकाळाबाबत मी बीसीसीआयशी नक्कीच चर्चा केली आहे. माझ्याकडे कागदपत्रे आली की मी स्वाक्षरी करेन आणि गोष्टी कशा पुढे नेता येतील यावर विचार करेन.”
द्रविडचे हे वक्तव्य बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासमवेत दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर आले आहे. या बैठकीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ निवडला जाणार होता, त्यात कराराबाबतही चर्चा झाली. त्यानंतर संघाची घोषणा करण्यात आली मात्र, द्रविडच्या या वक्तव्यामुळे बीसीसीआयवर प्रश्न नक्कीच निर्माण झाले आहेत. द्रविड हॉटेलमधून निघून गेला आहे म्हणजेच मीटिंग संपली होती.
बीसीसीआयने बुधवारी ही घोषणा केली
याआधी बुधवारी बीसीसीआयने राहुल द्रविडसह सर्व कोचिंग स्टाफचा कार्यकाळ वाढवण्याची घोषणा केली होती. त्यात द्रविड मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याचबरोबर विक्रम राठोड हे फलंदाजी प्रशिक्षक, पारस म्हांबरे गोलंदाजी प्रशिक्षक आणि टी दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. आता द्रविडच्या वक्तव्याने चिंता वाढली आहे. मात्र, अद्याप कागदपत्रे मिळाली नसल्याचे त्यांनी अधिकृतपणे सांगितले आहे. कागदपत्रे मिळताच तो निश्चितपणे स्वाक्षरी करेल.
विश्वचषक संपल्यानंतर द्रविडचा करार संपला
वास्तविक, टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये होणार आहे आणि द्रविडसह संपूर्ण प्रशिक्षक कर्मचाऱ्यांचा करार विश्वचषक संपताच संपला होता. अशा परिस्थितीत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण यांना मुख्य प्रशिक्षक बनवले जाईल, अशी माहिती समोर येत होती. या दरम्यानच्या सर्व शक्यतांमध्ये हे देखील उघड झाले की, बीसीसीआयने द्रविडला करार वाढवण्याचा प्रस्ताव दिला होता परंतु, द्रविड सुरुवातीला त्यासाठी तयार नव्हता. बुधवारी बीसीसीआयच्या घोषणेने सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला. बीसीसीआयने द्रविडच्या कराराची मुदत वाढवण्याची घोषणा केली होती. मात्र, कार्यकाळ किती वाढवण्यात आला, याबाबत कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. नुकत्याच संपलेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर कराराचा कालावधी संपल्यानंतर बीसीसीआयने राहुल द्रविडशी अर्थपूर्ण चर्चा केली आणि कार्यकाळ वाढवण्यास सर्वानुमते सहमती दर्शवली, असे बीसीसीआयने जारी केले होते.