आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक सामन्याला ६ जूनपासून सुरूवात होणार आहे. पहिलाच सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दरम्यान, इंग्लंडमधील कार्डिफ येथील स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही सराव सामन्यांत विजय प्राप्त केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाचा जिंकण्याचा आत्मविश्वास दृढ झाला आहे. श्रीलंका विरुद्ध झालेल्या पहिल्या सराव सामन्यात ३३३ धावांचे अवघड आव्हान भारताने पेलले होते आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात गोलंदाजांनी घणाघाती गोलंदाजीकरत कांगारुंना अवघ्या ६५ धावांवर गारद केले. यावरून संघातील फलंदाज आणि गोलंदाज उत्तम खेळासाठी पुर्णपणे सज्ज असल्याचे भारतीय संघाने दाखवून दिले आहे. दोन्ही संघ याआधी चॅम्पियन्स करंडकाचे विजयी दावेदार राहिले आहेत. त्यामुळे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका लढत महत्वाची ठरेल. पहिला सामना जिंकून चांगली सुरूवात मिळविण्याचा दोन्ही संघांचा मानस असेल.
नुकत्याच आयसीसीच्या संघ क्रमवारीत भारत अव्वल स्थानी असल्याचे मानचिन्हही भारतीय संघाला मिळाले. दोन्ही सराव सामन्यांतील भारताच्या कामगिरीवरून संघाच्या नियामक समितीच्या संघनिवडीच्या जबाबदारीला स्पष्टता मिळण्यास मदत झाली आहे.
चॅम्पियमन्स करंडक सामन्यांचा इतिहास पाहता, भारत आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या दोन्ही सामन्यात भारताला विजय मिळालेला आहे. त्यामुळे सामन्यात भारताचे पारडे दक्षिण आफ्रिकेपेक्षा जड असल्याचे दिसते. 

Story img Loader