विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. २०१९ चं वर्ष गाजवल्यानंतर भारतीय संघाने नवीन वर्षाची सुरुवातही आक्रमक पद्धतीने केली. घरच्या मैदानावर श्रीलंकेला टी-२० मालिकेत तर ऑस्ट्रेलियाला वन-डे मालिकेत पराभवाचं पाणी पाजलं. यानंतर नवीन वर्षात पहिला परदेश दौरा करणाऱ्या भारतीय संघाने आपला हा फॉर्म न्यूझीलंडमध्येही कायम राखला, टी-२० मालिकेत यजमान न्यूझीलंडला ५-० ने पराभूत करत व्हाईटवॉश दिला.
मात्र या मालिकेनंतर वन-डे मालिकेत भारतीय संघाचे उधळलेले वारु जमिनीवर आले…वन-डे मालिकेत भारतीय संघाला न्यूझीलंडने ३-० ने पराभूत करत टी-२० मालिकेतल्या पराभवाचा वचपा काढला. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, या वर्षी वन-डे मालिकेतल्या जय-पराजयाने फारसा फरक पडत नसल्याचं म्हटलं. यंदा वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात होणारा टी-२० विश्वचषक आणि कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ही भारतीय संघासमोरची प्रमुख आव्हानं असणार आहेत. मात्र वन-डे मालिकेतल्या पराभवामुळे अनेक भारतीय संघासमोर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत…या प्रश्नांची उत्तर आताच्या घडीला शोधणं हे विराटच्या दृष्टीने महत्वाचं नसलं तरीही याच्याकडे डोळेझाक करुनही चालणार नाही.
१) भारत अजुनही अनुभवी खेळाडूंवर अवलंबून –
न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत अखेरच्या सामन्यात भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला…आणि त्याला उरलेल्या दौऱ्यावर पाणी सोडावं लागलं. याआधी शिखर धवनला दुखापतीमुळे संघात स्थान मिळालं नव्हतं. या खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ या तरुण खेळाडूंना संधी दिली. मात्र वन-डे सामन्यांमधला अनुभव नसल्यामुळे तिन्ही सामन्यांमध्ये भारताचे नवे सलामीवीर अपयशी ठरले…ज्यामुळे भारतीय संघाला भक्कम सुरुवात मिळाली नाही.
पहिल्याच प्रयत्नात मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉकडून आक्रमक फलंदाजीची अपेक्षा करणं चुकीचं आहे यात काही शंका नाही. मात्र शिखर धवनचं वाढतं वय आणि दुखापत लक्षात घेता….भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती ठोस निर्णय घेऊन पर्यायी सलामीवीर म्हणून नवीन खेळाडूला संधी देणार का?? भारतीय क्रिकेटपटूचं व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता…एखाद्या महत्वाच्या स्पर्धेआधी प्रमुख खेळाडू जखमी झाला तर त्याला पर्याय म्हणून तितकाच सक्षम खेळाडू संघात असणं गरजेचं आहे. भारतीय संघाला वन-डे क्रिकेटमध्ये अशाच एका खेळाडूची गरज आहे ही बाब स्पष्ट झालेली आहे. फक्त ती निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाच्या लक्षात येते का हे पहावं लागणार आहे.
२) लोकेश राहुलवरची जबाबदारी पक्की करा…
ऋषभ पंतची यष्टींमागची खराब कामगिरी आणि फलंदाजीतला ढासळता फॉर्म यामुळे भारतीय संघाने लोकेश राहुलवर यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवली. अनपेक्षितपणे लोकेश राहुलनेही यष्टींमागे आश्वासक कामगिरी केली आहे, न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतही रोहितच्या अनुपस्थितीत विराटने संधी असतानाही राहुलला मधल्या फळीत खेळवलं. फलंदाजीतही राहुलने परिस्थितीनुसार खेळ करत आपलं काम चोख बजावलं.
मात्र आगामी टी-२० विश्वचषकाआधी लोकेश राहुलवर यष्टीरक्षणाची जबाबदारी देण्याची जोखीम भारतीय संघ घेणार आहे का??…आणि राहुलला यष्टीरक्षणाची संधी दिल्यास सलामीवीरासाठी पृथ्वी शॉ किंवा अन्य सक्षम फलंदाजांचा शोध घ्यावा लागणार आहे.
३) जसप्रीत बुमराहचं फॉर्मात असणं भारतासाठी महत्वाचं –
न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेत भारताला स्विकाराव्या लागलेल्या पराभवामागचं प्रमुख कारण हे जसप्रीत बुमराहला एकही विकेट न मिळणं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बुमराह हा भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. संघात स्थान मिळाल्यापासून फार कमी कालावधीत बुमराहने यशाच्या अनेक पायऱ्या पडल्या. गोलंदाजीतली वेगळी शैली, भन्नाट यॉर्कर टाकण्याची कला या सर्व गोष्टींमुळे बुमराह प्रतिस्पर्धी फलंदाजाला आपल्या तालावर नाचवतो.
मात्र न्यूझीलंडविरुद्ध मालिकेत बुमराहच्या शैलीचा अभ्यास करुन प्रतिस्पर्धी फलंदाज मैदानात उतरले होते असं वाटत होतं. चेंडू हातातून सोडताना त्याची ठेवण, टप्पा कुठे पडणार याचा अंदाज या सर्व गोष्टींचा अभ्यास करुन न्यूझीलंडच्या फलंदाजांनी बुमराहची गोलंदाजी खेळून काढली. या मालिकेत बुमराहने भलेही धावा कमी दिल्या असल्या तरीही त्याला विकेट न मिळणं हे भारतासाठी धोकादायक ठरलेलं आहे.
सुरुवातीच्या षटकांमध्ये फलंदाजांची जमलेली जोडी फोडण्याचं काम बुमराह आतापर्यंत करत आलेला आहे. बुमरहाकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नाही तर इतर गोलंदाजांवर विकेट घेण्याची जबाबदारी येते….आणि सध्याच्या संघात बुमराह, शमी आणि भुवनेश्वरचा अपवाद वगळता एकही गोलंदाज अनुभवी नाही. नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर हे गोलंदाज आश्वासक असले तरीही त्यांच्या गोलंदाजीवर या मालिकेत फलंदाजांनी अक्षरशः धावांची लयलूट केली. त्यामुळे आगामी बुमराहवर अतिक्रिकेटचा ताण येऊ द्यायचा नसेल तर आगामी टी-२० विश्वचषकापर्यंत त्याचा खुबीने वापर व्हायला हवा.
४) फिरकीपटूंचा पेच आणि मधल्या फळीतलं द्वंद्व –
कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल ही भारतीय फिरकीपटूंची जोडी संघात आल्यापासून…भारताचा फिरकीपटूंचा प्रश्न सुटला असं म्हटलं जात होतं. सुरुवातीच्या काळात कुलदीप यादव आणि चहलचे गुगली चेंडू खेळताना प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या नाकीनऊ येत होते. मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये कुलदीप यादव आपला फॉर्म गमावून बसलेला आहे. अशा परिस्थितीत कुलदीपला खेळवायचं की चहलला या प्रश्नावर त्वरित तोडगा काढणं गरजेचं आहे.
काही वृत्तपत्रांच्या बातमीनुसार कुलदीप सध्या १०० टक्के फिट नसूनही तो सामन्यात खेळतोय. याचमुळे त्याचा गोलंदाजीतला फॉर्म हरवला आहे. या परिस्थीतीमधून कुलदीपला बाहेर काढणं हे भारतीय संघासाठी महत्वाचं आहे.
याचसोबत मधल्या फळीत केदार जाधवला संधी द्यायची की नाही यावरही भारतीय संघाला उत्तर शोधावं लागणार आहे. अष्टपैलू केदार जाधवकडून बऱ्याच अपेक्षा असल्या तरीही गेल्या काही सामन्यातली त्याची कामगिरी फारशी चांगली नाही. विराट गोलंदाज म्हणून त्याचा वापर करत नसल्यामुळे केदारचा संघात योग्य पद्धतीने वापर होत नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. या सर्व गोष्टींमुळे मनिष पांडेसारख्या गुणवान खेळाडूला संघाबाहेर बसावं लागतंय…त्यामुळे जितक्या लवकर भारतीय संघ हा प्रश्न सोडवेल तितकं त्यांच्यासाठी चांगलं असेल.
विराटच्या म्हणण्याप्रमाणे यंदाच्या वर्षी वन-डे मालिकेचा निकाल हा फारसा महत्वाचा ठरणार नाही. मात्र प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने केलेला पहिला प्रयोग हा पुरता फसला आहे. भविष्यात परिस्थिती बिघडू द्यायची नसेल तर न्यूझीलंडविरुद्ध मालिकेचा गांभीर्याने विचार केलाच गेला पाहिजे, नाहीतर परिस्थिती बिघण्यास फारसा वेळ लागणार नाही.