टी-२० मालिकेत न्यूझीलंडच्या व्हाईटवॉश दिल्यानंतर भारतीय संघाला वन-डे मालिकेत धक्का बसला आहे. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या भारतीय संघाला सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ ०-२ अशा पिछाडीवर पडला आहे.

रोहित शर्मा आणि शिखर धवनच्या अनुपस्थितीत मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉला भारतीय संघाने संधी दिली. मात्र या जोडीला संधीचं सोनं करता आलेलं नाही. वन-डे मालिकेत रोहित शर्माची उणीव संघाला मोठ्या प्रमाणात जाणवली. SENA देशांविरोधात गेल्या ६ वन-डे सामन्यात रोहित शर्माविना खेळताना भारतीय संघ जिंकला आहे.

पहिल्या वन-डे प्रमाणे दुसऱ्या वन-डे सामन्यातही भारतीय सलामीवीरांनी निराशा केली. मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ ही जोडी झटपट माघारी परतली. यानंतर मधल्या फळीतल्या फलंदाजांनीही या सामन्यात निराशा केली. कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल आणि केदार जाधव हे फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतले. यानंतर मधल्या फळीत रविंद्र जाडेजाने सर्वप्रथम शार्दुल ठाकूर आणि त्यानंतर नवदीप सैनीसोबत महत्वपूर्ण भागीदारी रचत संघाचं आव्हान कायम ठेवलं. मात्र अखेच्या षटकांत फटकेबाजीच्या प्रयत्नात भारताने विकेट फेकत आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली. जाडेजाने ५५ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरनेही या सामन्यात ५२ धावा केल्या. याव्यतिरीक्त इतर फलंदाज अपयशी ठरले.

Story img Loader