Team India Playing XI 4th Test Match : बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२३ मध्ये भारतीय संघाने पहिल्या दोन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला. परंतु, तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळपट्टीवर पुन्हा एकदा फिरकीपटुंची जादु पाहायला मिळाली. त्यामुळे भारतीय फलंदाजांना ऑस्ट्रेलिया विरुद्ध विजयाच्या दिशेनं वाटचाल करता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करुन भारतीय फलंदाजांना तंबूत पाठवलं. त्यामुळे या मालिकेत भारताने २ -१ ने आघाडी केली असून ऑस्ट्रेलियाने इंदौर येथील सामना खिशात घालत मालिकेचं आव्हान कायम ठेवलं आहे. विश्व टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी ९ मार्चला अहमदाबाद येथे होणारा चौथा कसोटी सामना भारताला जिंकणं अनिवार्य आहे.
इंदौर येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्याचा तिकिट निश्चित केलं आहे. भारत किंवा श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध या अंतिम सामन्यासाठी मैदानात उतरु शकतो. भारताने चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारली, तर डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी भारताची जागा पक्की होईल. अहमदाबादमध्ये होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला किंवा सामना रद्द झाला, तर अंतिम सामन्यासाठी श्रीलंकेच्या न्यूझीलंड दौऱ्यात खेळवल्या जाणाऱ्या दोन कसोटी सामन्यांचा निकाल पाहावा लागेल.
भारतीय प्लेईंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता
शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय प्लेईंग ११ मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. विकेटकीपर आणि फलंदाज के एस भरतच्या जागेवर इशान किशनला चौथ्या कसोटी सामन्यात संधी मिळू शकते. भरतने मागील कसोटी सामन्यात निराशाजनक कामगिरी केली आहे. त्यामुळे इशान किसनला कसोटी सामन्यात पदार्पण करण्यची संधी मिळू शकते.
केएस भरतची निराशाजनक कामगिरी
कसोटी सामन्यांच्या मालिकेत भरत फलंदाजीत चमकदार कामगिरी करु शकला नाही. त्याने तीन कसोटी सामन्यातील पाच इनिंगमध्ये फक्त ५७ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी १४.२५ इतकी आहे. भरतने सहा झेल आणि एक स्टंम्पिंग केलं आहे. भरतने नागपूर कसोटी सामन्यात ८, दिल्लीत ६ आणि नाबाद २३ धावा केल्या होत्या. तर इंदौरमध्ये त्याने १७ आणि ३ धावा केल्या होत्या. इंदोर टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भरतला अप्रतिम कामगिरी करण्याची संधी होती, पण त्यावेळीही तो धावांचा डोंगर रचण्यात अपयशी झाला.
मोहम्मद शमीचं होणार पुनरागमन
शेवटच्या कसोटी सामन्यात मोहम्मद शमीला संधी मिळू शकते. इंदोर टेस्टमध्ये शमीला विश्रांती देण्यात आली होती. उमेश यादवने चांगली गोलंदाजी केली होती. परंतु, शमी अनुभवी गोलंदाज आहे. त्यामुळे सिराजच्या जागेवर शमीचा प्लेईंग ११ मध्ये समावेश केला जाऊ शकतो.
श्रेयस अय्यर किंवा सूर्यकुमार यादव
चौथ्या कसोटी सामन्यात श्रेयस अय्यरला बाहेर केलं जाऊ शकतं. टीम मॅनेजमेंटकडून सूर्यकुमार यादवचा प्लेईंग ११ मध्ये समावेश करण्याची रणनीती आखण्यात आली, तर अय्यरला बाहेर बसावं लागू शकतं. सूर्यकुमार यादवला पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. पण त्या सामन्यात त्याला अपयश आलं.
चौथ्या कसोटी सामन्यासाठी संभाव्य प्लेईंग ११
शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर/सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, इशान किशन/केएस भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी/मोहम्मद सिराज.