Team India and Rahul Dravid: राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण हे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेदरम्यान भारतीय संघाचे प्रभारीपद भूषवण्याची शक्यता आहे. विश्वचषक संपल्यानंतर आठवडाभरात ही मालिका सुरू होईल. विश्वचषकाबरोबरच मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा करारही संपुष्टात येईल आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) माजी भारतीय कर्णधाराला बीसीसीआयच्या नियमांनुसार या पदासाठी पुन्हा अर्ज करण्याची विनंती करण्याचा पर्याय असेल. राहुल द्रविडला बीसीसीआय पुन्हा आमंत्रित करण्यासाठी प्रयत्न करणार का? याबाबत सध्यातरी कल्पना नाही.
५१ वर्षीय द्रविडला राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम राहायचे आहे की नाही, हे पाहणे महत्वाचे असेल कारण त्यात खूप प्रवास आणि सतत दबाव असतो. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्ससारख्या संघांचे प्रशिक्षक असलेला द्रविड या टी२० लीगमध्ये पुनरागमन करू शकतो ज्यामध्ये आता १० संघ खेळत आहेत.
मात्र, द्रविड आणि सूर्यकुमार यादव यांच्याशिवाय संपूर्ण संघाला विश्वचषकादरम्यान देशात १० हजार किमीहून अधिक प्रवास केल्यानंतर विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “जेव्हाही राहुलने ब्रेक घेतला तेव्हा व्हीव्हीएस लक्ष्मणने नेहमीच जबाबदारी सांभाळली आहे आणि विश्वचषकानंतर लगेचच होणाऱ्या या मालिकेतही तेच सुरू राहण्याची अपेक्षा आहे.”
बीसीसीआयच्या सूत्राने इनसाइडस्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “जर नवीन प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले गेले तर लक्ष्मण हा प्रबळ दावेदार असेल कारण, बीसीसीआयने अशी प्रक्रिया तयार केली आहे जिथे एनसीएचा प्रभारी आणि संपूर्ण यंत्रणेचे ज्ञान असलेल्या व्यक्तीला या भूमिकेसाठी तयार केले जाईल.”
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० संघात वेस्ट इंडिज आणि आयर्लंडविरुद्धच्या मालिकेव्यतिरिक्त आशियाई खेळांच्या संघाचा भाग असलेल्या खेळाडूंचा समावेश असेल. रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल. राहुल आणि जसप्रीत बुमराह या खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी तंदुरस्त होण्यासाठी विश्रांती दिला जाण्याची शक्यता आहे. जिथे भारताला तीन टी२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेला २३ नोव्हेंबरपासून विशाखापट्टणममध्ये सुरुवात होणार आहे.
विश्वचषकातील भारताची आतापर्यंतची कामगिरी
भारत २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत शेवटचे पाच सामने जिंकून अपराजित आहे. हा संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा फॉर्म अद्याप प्रभावी दिसत नाही. विश्वचषकातील त्यांच्या शेवटच्या ५ सामन्यांपैकी त्यांना फक्त एक सामना जिंकता आला आहे. याआधी २६ ऑक्टोबरला इंग्लंडच्या संघाचा श्रीलंकेकडून आठ गडी राखून दारूण पराभव झाला.